विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भाजप वा शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राणा जगजितसिंह हे आजारी असल्याने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ आॅगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे चुलत बंधू अमल महाडिक हे दक्षिण कोल्हापूरचे भाजप आमदार आहेत. माजी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलिप सोपल हे २८ आॅगस्टला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत.
दिलीप सोपल यांनीहीठोकला रामराम !राष्टÑवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी पक्षाला रामराम ठोकला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. आ. सोपल हेही शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मात्र, स्थानिक राजकारणातून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपमध्ये येताच चित्रा वाघ महामंडळावरराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नेमण्यात आले आहे. अन्य नियुक्त सदस्यांमध्ये दर्शना महाडिक - रत्नागिरी, वीणा तेलंग -नागपूर, शलाका साळवी -मुंबई, रितू तावडे -मुंबई, चंद्रकांता सोनकांबळे -पिंपरी, मीनाक्षी पाटील - लातूर, साधना सुरडकर - औरंगाबाद, उमा रामशेट्टी - परळी, डॉ.शैलजागर्जे - आष्टी, अर्चना डेहनकर - नागपूर.