- वैभव गायकरपनवेल : ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो. खडक फोडून तयार केलेल्या पाय-या व शेवटच्या टप्पा दोरखंडाच्या सहाय्याने चढून जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक याठिकाणी हजेरी लावत असतात. वर्षाला ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक येथे येत असून या ठिकाणाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रबळमाची गावापर्यंत जाण्यासाठी रोडही बनविण्यात आला नसल्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.प्रबळगडावरून दिसणारा कलावंतीन दुर्गचा सुळका पर्यटकांचे व हौशी छायाचित्रकारांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरून गड व त्यावर जाण्यासाठीच्या खडतर पायºया देशातील व विदेशातील पर्यटकांना याठिकाणी येण्यास भाग पाडत आहेत. ट्रेकिंगची आवड जोपासणारे एकदा तरी कलावंतीन दुर्गवर जायचे स्वप्न पहात असतात. पनवेलपासून जवळ असलेले दोन्ही किल्ले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. रायगडनंतर सर्वाधिक भेट देणाºया किल्ला म्हणूनही याची ओळख आहे. परंतु पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकही योजना अद्याप राबविण्यात आलेली नाही.ठाकूरवाडीपासून पाच किलोमीटरपेक्षा जास्त डोंगर पायी चढून प्रबळमाजी गावामध्ये जावे लागत आहे. येथील दोन्ही आदिवासी वाड्यांपर्यंत जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता करण्यात आलेला नाही. यापूर्वी केलेल्या रोडची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रोड वाहून गेला असून फक्त पायवाट शिल्लक आहे. यामुळे पर्यटकांना ठाकूरवाडीमध्ये गाडी लावून प्रबळमाचीपर्यंत जावे लागत असून तेथून पुन्हा कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाची अवघड वाट पूर्ण करावी लागत आहे.प्रबळ गडावर जाण्यासाठी कलावंतीनच्या पायथ्यापासून पायवाट आहे. पायवाटेची स्थिती बिकट असून ती व्यवस्थित करण्याची गरज आहे. वाट व्यवस्थित नसल्यामुळे अनेक पर्यटकांना गावात येवून पुन्हा दुसºया वाटेने गडावर जावे लागत आहे. प्रबळगडावर जाण्याची वाटही ओढ्यातून आहे. गडावर पुरातन वास्तूचे अवशेष आहेत. पाण्याच्या टाक्या, काळाबुरूज पाहण्यासारखे आहे. परंतु घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणांकडे जाण्यासाठीची वाट अवघड झाली आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्यामुळे येथे येणाºया पर्यटकांना गड पाहताना अडचणी निर्माण होत आहेत.प्रबळगडाचा इतिहास१४९० - बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला.१६३६ - शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ वशिवाजी महाराजांचे वास्तव्य किल्ल्यावर होते.१६३६ - शहाजी राजांनी तहामध्ये हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीला दिला१६५७ - छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण, कल्याण भिवंडी प्रांत व तेथील किल्ले काबीज केले. या मोहिमेमध्ये महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीतील प्रबळगड, प्रधानगड, चौल, तळागड, घोसाळगड हे किल्ले जिंकले. स्वराज्याचे सरदार आबाजी महादेव यांनी हा प्रांत स्वराज्यात आणला.१६६५ - पुरंदरच्या तहामध्ये २३ किल्ले मोघलांना देण्यात आले त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता. तह मोडल्यानंतर पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आला.१६८९ - मोघलांनी छापा टाकून मध्यरात्री हा किल्ला ताब्यात घेतला, परंतु नंतर लगेचच तो पुन्हा मराठ्यांनी जिंकला.१८१८ - प्रबळगड इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी किल्ल्यावरील वास्तू पाडून टाकल्या.१८२८ - ब्रिटिशांविरोधात उठाव करणाºया देशप्रेमी ३०० लढवय्याने या किल्ल्यावर आश्रय घेतला होता.
कलावंतीनसह प्रबळगडाकडे दुर्लक्ष, वर्षाला ५० हजार पर्यटकांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:17 AM