ऑनलाइन लोकमत
मिरज(सांगली), दि. 8 - राज्यभर चर्चेत असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली आहे. केवळ दहा महिन्यात अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची बदली झाली असून, डॉ. सापळे यांनी बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी गतवर्षी आॅगस्टमध्ये नागपूर येथील डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आता लगेचच त्यांची बदली नागपूरला केल्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढला आहे.
म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर भ्रूण हत्याकांड उघडकीस आले होते. त्याची चर्चा राज्यभरात आहे. डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या या अवैध कृत्याच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. अधिष्ठाता डॉ. सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत डॉ. खिद्रापुरे यास दोषी ठरविले आहे. त्याच्याविरुध्द आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र कारवाई करण्याची व वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस केली आहे. या समितीच्या अंतिम चौकशी अहवालावर आरोग्य विभागाचा निर्णय होण्यापूर्वीच सापळे यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
बदली रद्द करण्याची मागणी-
बदलीबाबत डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मिरज शासकीय महाविद्यालयात रक्तपेढीसह अन्य कामे पूर्ण करावयाची असल्याने नागपूर येथे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चून ‘एम्स’च्या धर्तीवर मोठे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. तेथील अधिष्ठातापद रिक्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी माझी तेथे नियुक्ती केली आहे. मात्र मिरजेतील कामे अपूर्ण सोडून नागपूरला जाण्याची इच्छा नाही.