पुणे : जनजागृती, महिनाअखेर आणि आजारांच्या साथीचा फटका विक्रीला बसला असून, नेहमीपेक्षाही निम्म्या प्रमाणातही फटाके विकले न गेल्याचे फटाका विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा दणदणाट जरा कमीच झाल्याचे दिसून येत आहे.५ ते १४ वर्षांदरम्यानच्या मुलामुलींमध्ये फटाक्यांच्या दणदणासाठी असलेले औत्सुक्य, व्यावसायिकांमध्ये फटाके वाजवून धमाका उडवून देण्याची असलेली स्पर्धा आणि गुंठामंत्री मंडळी किंवा नवश्रीमंतांमध्ये आकाशात जाणारे फॅन्सी, रंगीबेरंगी फटाके वाजविण्याची हौस यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये काही भागात फटाक्यांच्या वापराचे प्रमाण वाढले होते. यंदा अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन अशा सणांच्या वेळीही फटाके वाजविण्याचे प्रमाण कमीच होते. स्थानिक पातळीवरील फटाका स्टॉलमध्ये फटाके महाग मिळत असल्याने महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत स्टॉलवर खरेदी करण्याची हौशींची पद्धत आहे. यंदा डीपी रस्त्यावरील स्टॉल्सना बंदी असल्याने शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ, वडगाव शेरी येथील मुळीक ग्राऊंड अशा ठिकाणी फटाका स्टॉल्सचे स्थलांतर झाले. याशिवाय काही ठिकाणी भर चौकांमध्ये अनधिकृत स्टॉलही उभारण्यात आले. फटाका स्टॉलवरील सलग आठवडाभराचे चित्र पाहता खरेदीसाठी तुरळक संख्येने ग्राहक असल्याचे दिसून आले. नारायण पेठेतील कायमस्वरूपी दुकानांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणच्या स्टॉल्सवर ग्राहकांची नेहमीसारखी झुंबड दिसून आली नाही. (प्रतिनिधी) >विद्यार्थ्यांनी घेतली शपथ : शाळांमधील जनजागरण ठरले महत्त्वाचे महिनाअखेरीस आलेली दिवाळी, शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषणमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली शपथ आणि डेंगी, चिकुनगुनिया अशा रोगांच्या साथींचा प्रादुर्भाव अशी काही कारणे फटाके न फुटण्यामागे असल्याचे दिसते.मिसाळ फटाका मार्टचे गणेश मिसाळ म्हणाले, नेहमीपेक्षा ५० टक्के फटाक्यांची विक्रीही यंदा झालेली नाही. आम्ही नेहमीचा माल विकून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा माल भरतो. तसे यंदा झाले नाही. शाळांमध्ये दिलेल्या शपथा, महिनाअखेर आणि आजार अशी कारणे असावीत.अभिनव महाविद्यालयाच्या एनएसएसचे प्रमुख विनोदकुमार बंगाळे म्हणाले, गेली ६ ते ७ वर्षे आम्ही विद्यार्थ्यांना शपथ देत आहोत. यंदा चायनीज फटाकेही उडवू नयेत अशी शपथ दिली होती. जागृतीमुळे यंदा फटाके वाजविण्याचे, उडविण्याचे प्रमाण घटलेले दिसून येते.
दणदणाट यंदा कमीच
By admin | Published: October 31, 2016 1:04 AM