- सूर्यकांत बाळापुरे, किल्लारी (जि. लातूर)
महाप्रलयंकारी भूकंप होऊन २३ वर्षे उलटली, तरी किल्लारी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.मराठवाड्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप होऊन लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. यात दहा हजारांपेक्षा जास्त जीवितहानी झाली. या घटनेतून सावरण्यासाठी १२०० कोटींचा निधी जागतिक पातळीवरून उपलब्ध झाला. किल्लारीचे पुनर्वसन ७०० एकर क्षेत्रावर झाले असले तरी गावातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्याने पावसाळ्यात ये-जा करणे कठीण आहे. विलासराव देशमुख यांनी रस्त्यांसाठी २० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही. किल्लारीला ३० खेडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा माकणीच्या निम्न तेरणा प्रकल्पातून होतो. मात्र प्रकल्प ते किल्लारीपर्यंतची जलवाहिनी वारंवार फुटत आहे. परिणामी, किल्लारीला महिन्यातून एकदा पाणी मिळत आहे.भूकंपग्रस्तांना विनाअट सरकारी नोकरी देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी आरक्षणही मंजूर करण्यात आले. मात्र त्याचा अपेक्षित फायदा भूकंपग्रस्तांना झाला नाही. त्यास विरोध झाल्याने आरक्षणाची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे.बाजारपेठ बंद : किल्लारीमध्ये ३० सप्टेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. या दिवशी गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद असते. जुन्या किल्लारीत भूकंपातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येते. स्मृतिस्थळाची देखभाल हवी : किल्लारी येथे चार एकरवर स्मृतिस्थळ आहे. येथे उद्यान निर्मिती करून कारंजे बसविण्यात आले होते. मात्र काही कालावधीतच त्याची दुरवस्था झाली आहे. त्याची देखभाल वनविभागाकडे देण्यात आली होती. मात्र सध्या येथे सुविधा नाहीत.