मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाच पक्षातील इच्छुकाची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे पक्षात अंतर्गतवाद मोठ्याप्रमाणात होतांना दिसत आहे. तर पैठण मतदारसंघात सुद्धा पक्षातील अंतर्गतवाद राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी आमदार संजय वाघचौरे आणि राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा अनिता वानखेडे यांच्यातील वाद विकोपाला गेले आहे.
विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे युती आणि महाआघाडीच्या पक्षातील इच्छुक उमदेवारांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच पक्षातील वाढते अंतर्गत वाद सर्वच पक्षांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे पैठण मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद आता तालुक्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. माजी आमदार वाघचौरे आणि तालुका अध्यक्षा अनिता वानखेडे यांच्यातील गटबाजीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील होणाऱ्या पक्षाचे कार्यक्रम सुद्धा दोन्ही नेते वेगवेगळ्याप्रकारे घेत आहे. त्याचच उदाहरण म्हणजे, नुकतेच झालेल्या अनिता वानखेडे यांच्या संपर्क कार्यलयाचे उद्घाटनावेळी संजय वाघचौरे यांची उपस्थिती दिसून आली नाहीत. तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी तालुक्यात भेटीगाठी सुरु केल्या असून, पक्षाची उमदेवारी आपल्यालाच मिळणार असे दावे सुद्धा केले जात आहे.
पैठण मतदारसंघाचा विचार केला तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात थेट लढत होत असते. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेले संजय वाघचौरे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी वाघचौरे यांचा पराभव करत चौथ्यांदा आमदार बनण्याचा मान मिळवला. त्यामुळे यावेळी सुद्धा या दोन्ही पक्षातच थेट लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र पक्षातील अंतर्गतवाद राष्ट्रवादीसाठी अडचणीचे ठरू शकतात हे मात्र विशेष.