मनीषा म्हात्रे, मुंबईपाकिस्तान, बांग्लादेशातून येणाऱ्या बनावट नोटांवर, ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीमुळे आळा बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत १० लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत, तर सरकारने मंगळवारी रात्री अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे बनावट नोटांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिवसाला कोट्यवधींची उलाढाल सुरू असते. यापैकी अवघ्या दक्षिण मुंबईत हवालामार्गे तब्बल १५ ते २० कोटींचा व्यवहार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये हे बनावट नोटांची तस्करी करणारी मंडळी गर्दीची ठिकाणे, छोट्या बाजापेठांना टार्गेट करत असतात. ५० रुपयांच्या खरेदीसाठी पाचशे किंवा हजाराची नोट देऊन त्या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. जानेवारी ते जुलै दरम्यान, मुंबई पोलिसांनी केलेल्या १० विविध कारवाईदरम्यान तब्बल १० लाख ५४ हजार ९०५ रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या नोटा बाजारपेठांतून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापारी या नोटा नाकारत आहेत. परिणामी, पोलिसांनी पुढच्या काही दिवसांसाठी यातून सुटका झाल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. बनावट नोटांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेतील कक्ष ६ काम करते. आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील नोटा या चीन, नेपाळमार्गे, तर बांग्लादेशातील पश्चिम बंगालमार्गे देशात विखुरल्या जात आहेत. दोन लाखांच्या बदल्यात बनावट साडे तीन लाखांचा भाव सध्या सुरू आहे. त्यानुसार, देशातील विविध भागातील मंडळी पैशांच्या लालसेपोटी त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावताना दिसतात. या पैशांचा वापर व्यवहारांबरोबरच, अंमली पदार्थांची तस्करी, मटका, जुगार, लॉटरीमध्ये, अथवा विविध खेळांमध्येही होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तान, बांग्लादेशातील बनावट नोटांना बसणार आळा
By admin | Published: November 10, 2016 6:30 AM