कल्याण - महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. मात्र कांदे, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत असं वक्तव्य केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आयोजित राम कापसे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
कपिल पाटील म्हणाले की, एकीकडे 750 रुपये किलो दराने मटण घेतो, 500 -600 रुपयांचा पिझ्झा आपण खातो. मात्र दुसरीकडे 10 रुपयांचा कांदा, 40 रुपयांचे टोमॅटो आपल्याला महाग वाटतात. महागाईचे समर्थन कोणीही करणार नाही. मात्र कांदे, बटाटेचे भाव कमी करण्यासाठी त्यांना प्रधानमंत्री करण्यात आलेले नसून आपण त्यामागील कारणे समजून घेतली तर त्यांना दोष देणार नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच सीएए कायदा असो, 370 कलम असो की 35 ए सारखा सगळ्यात घातक कायदा असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळेच हे कायदे रद्द होऊ शकले आणि यासारखे धाडसी निर्णय घेण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल
कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे सूचक विधानही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले. काश्मीरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांनी केलेल्या कायद्याचा दाखला दिला होता. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत काश्मीरबाबत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे पी.व्ही.नरसिंह राव यांनी नमूद केले. त्याचाच संदर्भ जोडून हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतो असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिल्याचेही कपिल पाटील यांनी आठवण करुन दिली.