मुंबई : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे बेळगावसह सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आज बेळगावमध्ये जाणार आहेत. आपल्या देशात पाकिस्तानी घुसू शकतात, बांग्लादेशी घुसू शकतात, रोहिंग्या घुसू शकतात, मात्र महाराष्ट्रातून कोणी बेळगावला जाऊ शकत नाही हे चुकीचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'भारतात कोणालाही कोठेही जाण्याची बंदी घातली जाऊ शकत नाही. आपल्या देशात पाकिस्तानी घुसू शकतात, बांग्लादेशी घुसू शकतात, रोहिंग्या घुसू शकतात, मात्र महाराष्ट्रातून कोणी बेळगावला जाऊ शकत नाही हे चुकीचं आहे. बेळगावबाबत वाद आहे, मात्र हा वाद इतकाही नाही की एकमेकांवर बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालावी. आपण एका देशाचे नागरिक आहोत. मी बेळगावला जाणार आहे आणि लोकांशी बोलणार आहे. तेथील लोकांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत. त्यामुळे मी जरुर जाईल. बंदी लावायची असेल तर लावू द्या. मात्र, मला विश्वास आहे तेथील सरकार देखील समजूतदारपणे काम करेल' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक पोलिसांनी येड्रावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वत: बेळगावला जाण्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. 'महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की.. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले.. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? मी उद्या बेळगावला जात आहे' असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.
भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. 17 जानेवारी 1956 यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अशोक चव्हाणांचा आदर्श, कार्यकर्त्यांनी लावलेलं अनधिकृत बॅनर स्वतः हटविलं अन्...
'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'
निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला
'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'