अनिरुद्ध पाटील,
डहाणु/बोर्डी- मान्सून रिटर्नच्या फटक्याने गेल्या महिन्यात संकटात असलेला शेतकरी आता लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. डहाणू तालुक्यातील मोठ्या भात शेतीच्या पट्ट्यामध्ये लोंब्या नष्ट होत असल्याने आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आदिवासी शेतकरी पुरता धायकुतीला आला आहे.दोन वेळा झालेली अतिवृष्टी वगळता यंदा एकुणच पाऊस चांगला झाल्याने भात पीक जोमात आले आहे. परंतु डहाणू तालुक्यात कापणीला आलेल्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती बळीराजाला सतावते आहे.तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या करीता शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, कृषी सहाय्यक विशाल नाईक, सुरेश बारी यांनी क्षेत्र भेटीद्वारे परिसरातील भात शेतींची पाहणी केली. २४ ते ४८ तासात पिकाचे मोठे नुकसान कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पहाणीमध्ये जांबुगाव, अस्वाली, खुनावडे या आदिवासी गावात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. उभ्या भात पिकावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने २४ ते ४८ तासात पिकाचे मोठे नुकसान करीत आहेत. या किडीची अळी दिवसा मातीमध्ये लपून राहते. तर रात्रीच्या वेळी बाहेर येऊन भात पिकाच्या तयार ओंब्या तोडून खाते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त शेतात असंख्य ओंब्या व दाणे जमिनीवर पडून पिकाची नासाडी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी हवालिदल झाला आहे. >‘फोरेट १० जी’चा वापर कराकापणीला आलेल्या भात पिकाच्या संरक्षणासाठी पिकाची त्वरित कापणी करावी. ज्या शेतात अळीची लागण झाली आहे तेथून लष्करी अळी दुसऱ्या शेतात जाण्याची दाट शक्यता आहे. भात कापणीला ८ ते १० दिवसांचा अवधी असल्यास शेताच्या सभोवताली बांधाच्या कडेने फोरेट १० जी दाणेदार हे किटकनाशक टाकावे. शिवाय दुसऱ्या शेतातून अळया रोखण्यासाठी तयार भात पीक कापुन सुरिक्षत जागेत ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना अमलात आणून भात पिकाचे रक्षण करावे असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले आहे.