मुंबई : नविनर्मित पालघर जिल्हा प्रशासनातील ५२४ रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज केली. या संबंधीचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यात लिपिक, तलाठी आदी पदे आहेत. राज्यात तलाठी व लिपिक संवर्गीय पदांच्या भरतीचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात आला होता. त्याला वित्त विभागाची मान्यता घेऊन वित्त विभागाकडून ७५ टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित भरतीच्या जागांमध्ये ४०० पदांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हयातील सरळसेवेतील ४९ रिक्त पदे व पालघर जिल्हयातील १०६ लिपिक वर्गीय पदांची भरती होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या नोंदणी विभागात एकूण कनिष्ठ लिपिकांची ९१८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४३७ पदे रिक्त आहेत. त्यातील ३३७ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे राठोड यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
पालघरमध्ये ५२४ पदे तत्काळ भरणार
By admin | Published: September 12, 2015 2:09 AM