मुंबई: काँग्रेसची एकंदर राजकीय वागणूक ही 'लेना' बँकेसारखी आहे, 'देना' बँकेसारखी नाही, असे विधान बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केले. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या स्वार्थी वृत्तीमुळे विरोधक एकटवत नसल्याचा आरोप केला.
पालघर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांच्या दमदार कामगिरीनंतरही भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) बळीराम जाधव यांनी जवळपास सव्वादोन लाख तर माकप आणि काँग्रेसने अनुक्रमे 71 हजार आणि 47 हजार मते मिळवली. त्यामुळे काँग्रेस आणि बविआने निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, असे मत राजकीय तज्ज्ञांनी मांडले. यावरून बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी तुम्ही काँग्रेससोबत युतीसाठी चाचपणी केली होती का, असा प्रश्न चर्चेदरम्यान विचारण्यात आला. त्यावेळी ठाकूर यांनी काँग्रेसच्या राजकीय स्वभावामुळे ही युती प्रत्यक्षात आली नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचे वर्तन हे लेना बँकेसारखे आहे, देना बँकेसारखे नाही, असे त्यांनी सांगितले.