मुंबई: डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून सोशल मिडीयावर रविवारी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. या संपूर्ण घटनाक्रमाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून कारवाई सुरु केली आहे. यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
पालघरमधील घटनेवरून असे दिसते की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. खालच्या स्तरावर काय घडते यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. लोकांचा संयम सुटत असून ही सुरुवात आहे. सरकार एकूणच नियंत्रण गमावत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
यानंतर राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना बाळासाहेबांच्या राज्यात हिंदू आहोत हे गर्वाने सांगितले जात होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या राज्यात हिंदू असाल तर घाबरून रहावे लागते, हा फरक असल्याची बोचरी टीका केली आहे.
दरम्यान, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.