विद्यार्थिनीला शाळेत येण्यास पाच मिनिटं विलंब झाला म्हणून मुख्याध्यापिकेने तब्बल ५० उठाबशा काढायला लावल्या. त्यामुळे विद्यार्थिनीची प्रकृतीच ढासळली. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मागील तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काही दिवसांवर परीक्षा आलेली असतानाच मुख्याध्यापिकेने अशी शिक्षा केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रुग्णालयात उपचार घेणारी विद्यार्थिनी पालघर शहरात असलेल्या भगिनी समाज विद्यालयात शिकते. ती दहावीच्या वर्गात असून, पालघर (टेंभोडे) येथे राहते. १३ वर्षीय विद्यार्थिनीला १७ जानेवारी रोजी सकाळी शाळेत येण्यास पाच मिनिटं उशीर झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिला ५० उठाबशा काढण्याची शिक्षा केली. अचानक तब्बल ५० उठाबशा काढल्यामुळे मुलीच्या मांड्या आणि पायामध्ये गोळे आले. त्याचबरोबर तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही वेळाने तिला उलटी झाली आणि प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी मुलीच्या पालकासह मुख्याध्यापिकेलाही बोलावलं
या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी पालघर पोलीस ठाण्यात १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांना पोलिसांनी बोलावून घेतलं. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत मुलीच्या आईने आणखी एक धक्कादायक माहिती दिली.
यापूर्वी एकदा आजारी पडलेली मुलगी शाळेत बूट न घातला गेली होती. त्यावेळी तिला मासिक पाळी आलेली असतानाही मैदानावर पळण्याची शिक्षा करण्यात आली होती. त्यावेळीही तिला त्रास झाला होता, अशी माहिती पोलिसांना आईने दिली.
मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची परिस्थिती झाली होती. पण उपचार घेत असलेल्या मुलीने तक्रार करू नये अशी विनंती केली. त्यामुळे मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. पण, यापुढे अशा पद्धतीने शिक्षा करू नये असे, निर्देश पोलिसांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना दिले.
मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीची घेतली भेट
शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आपण या मुलीला भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी सामंजस्याने तक्रार मागे घेण्यात आली. यापुढे असे प्रकार शाळेत होणार नाहीत."