Palghar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी महाराष्ट्रात १३ मतदारसंघामध्ये मतदान पार पडले. यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाला. ठाकरे गटाकडून भारती कामडी, भाजपकडून डॉ. हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील यांच्यात लढत पाहायला मिळाली. मात्र आता या निवडणुकीसाठी भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या आमदाराने भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. पैसे वाटप करताना व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पालघरमध्ये निवडणुकीआधी पैसे वाटप केले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विक्रमगड मतदारसंघातील असल्याचे समोर आलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये दोन तरुण एका घरामध्ये पैसे वाटताना दिसत आहे. एका तरुणाच्या हातात पैसे आहेत तर दुसऱ्या तरुणाच्या हातात मतदारांची यादी आहे. पैसे वाटणारा तरुण हा पैसे मतदाराला आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे असं सांगत आहे. कोणीही काही बोललं तरी तीन नंबरच्या उमेदवारालाच मत द्यायचे आहे. यादीत नाव नसेल तर शोधा आणि पैसे घेऊन जा असेही हा तरुण म्हणताा दिसत आहे. लोकमत या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
पैसे वाटल्याचा हा पुरावा आहे - सुनील भुसारा
"भाजपने विक्रमगडसह संपूर्ण पालघर मतदारसंघात पैसे वाटप केल्याची चर्चा सुरु होती. त्याला आता या व्हिडीओमुळे दुजोरा मिळाला आहे. एका मतदानकेंद्रावर भाजपने अडीच लाख रुपये खर्च केल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु आहे. हा व्हिडीओ त्याचा पुरावा आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भाजपने केले आहे. मी निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली.