मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप निकालाच्या दिवशाही सुरुच आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून भाजपासह निवडणुक आयोगावर निशाना साधला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, पालघरमध्ये मतदान संपल्यानंतर 12 तासांच्या आतच निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी बदलली. मतदार याद्यांमधून 50 ते 60 हजार मतदारांची नावे गायब झाली. या सगळ्या घटना संशयास्पद आहेत. त्यामुळे पालघरमधील भाजपाचा हा विजय नसून निवडणूक आयोगाचाच विजय आहे, असा टोला त्यांनी लगावला. याचबरोबर, राज्यासह देशात ज्या-ज्या ठिकाणी विरोधक एकत्र लढले, त्याठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा नव्हे तर भाजपाचीच घंटा वाजली आहे, असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
Palghar Loksabha Bypoll Result 2018 : हा विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 2:09 PM