भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच बावनकुळेंनी गिरीश महाजनांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेत पालघरची जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळांची यांच्या भेटीला आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकच्या जागेवरील दावा सोडायला शिंदे गट तयार नाहीय. त्यातच भुजबळांनी भाजपाने आपल्याला उमेदवारी घेण्यास संमती दिली होती असा दावा करत विलंब होत असल्याने मी दावा सोडत असल्याचा दबाव आणला होता. तरीही शिंदे गट उमेदवार जाहीर करत नाहीय. आज ठाणे आणि कल्याणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे-भुजबळ भेट महत्वाची मानली जात आहे.
नाशिकचा उमेदवार आज जाहीर होणार आहे. पालघर भाजपा लढविणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदे यांनीच काय तो निर्णय घ्यावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला गेल्यामुळे भाजपाच्या काही नाराज इच्छुकांनी उमेदवार पराभूत होईल अशा प्रकारची चर्चा सुरू केली आहे या संदर्भात बोलताना बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता देण्यासाठी सर्वजण सज्ज आहे नाराजी काही काळ असते मात्र अशी पाडापाडी किंवा कोणाला पराभूत करता येत नाही असे ते म्हणाले.