पालघर: शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभूत केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्याचा फटका गावित यांना बसला.
डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरवलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. याच नाराजीचा फटका रोहित गावितांना बसला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.
कोण आहेत राजेंद्र गावित?अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. मूळचे काँग्रेसचे असलेले गावित यांनी आधी भाजप आणि मग शिवसेना असा प्रवास केला आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी २०१८ साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेनं चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती. त्यानंतर शिवसेना-भाजपची युती झाली. जागावाटपात पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक जिंकली.