वसई: शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौऱ्यावर जात आहेत. पालघर जिल्ह्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसख्या सर्वाधिक आहे. या समाजाचा मुख्य उद्योग म्हणजे शेतीवाडी आहे. आज ह्या समाजातील शेतकरी अभ्यासू आणि प्रयोगशील आहे. पिढीजात शेती करीत असताना कुटुंबाची गुजराण करण्याचे साधन असे न बघता आधुनिकतेची कास धरुन शेती हा उद्योग जास्तीत जास्त फायदेशीर कसा होईल, याकडे सतत पाठपुरावा निरनिराळ्या प्रयोगाद्वारे नेहमीच शेतीमध्ये प्रगती करीत आहे. राहुरी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु पद्माश्री हरिश्चंद्र गोपाळराव पाटील यांनी जपानी शेती भारतात प्रथम रुजवणाऱ्या समाजाच्या सुपुत्राने भाताच्या उत्पन्नात क्रांती घडवून आणली. जागतिक पातळीचे थोर कृषीतज्ञ व भारत सरकार नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील तसेच निसर्गशेतीचे गाढे पुरस्कर्ते गांधीवादी निसर्गमित्र व बजाज पारितोषिक सन्मानित स्व. भास्कर सावे अशा कितीतरी समाजातील कृषीतज्ञ व्यक्तींनी शेतीच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच नेला. शेतीमधील या महान व्यक्तींचा पाठपुरावा करुन देहेरी पासून वसई पर्यंतच्या या शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान, आधुनिकता व अभ्यासू वृत्ती अंगिकारुन शेती व्यवसायामध्ये एक निराळा ठसा उमटवला इतकेच नव्हे क्रांती घडवली. शेतीमध्ये जे जे काही नवीन आहे ते अंगिकारण्याची वृत्ती बाळगून नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याच्या मागे अभ्यासू वृत्तीने प्रयत्नशील राहतात. आज समाजातील उच्च विद्याविभूषित तरुणही नोकरीच्या मागे न धावता मोठ्या प्रमाणात शेती, भाजीपाला, फळे बागायती व्यवसाय करु लागला आहे.>नवनवे प्रयोग अन आधुनिकतेची कास धरणारदेहेरी, बोर्डी, डहाणू भागातील चिकू बागा, लिचीची लागवड, फळबागा, चिंंचणी, तारापूर, वाणगांव पट्टयातून भोपळी मिरची - केळीच्या बागा, फुलबागा आणि भाजीपाल्याचे मळे फुलवून वाणगांव पॅटर्न निर्माण केला. आगाशी, वसई भागांतील फुलबागा, राजेळी केळी व त्यापासून निर्माण होणारी सुकेळी अशा कितीतरी पॅटर्नने परिपूर्ण असलेला हा समाज आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांच्यामुळे २२ शेतकरी इस्त्रायलच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आमच्या भागातील शेतकरी हा नेहमीच अभिमानाने म्हणतो की, कोण म्हणतो शेती परवडत नाही ? अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ असो आमचा शेतकरी हा उत्तमच पिक घेतो. आत्महत्या हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही किंबहुना असा विचार कोसो दूर असतो. ही सहल शेतकऱ्यांना बरेच काही देऊन जाईल असे चोरघे यांनी सांगितले.
पालघरचे शेतकरी इस्त्रायलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 3:10 AM