पंढरपूर : पालखी मार्गावरील मुक्कामी ठिकाणी प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उभारण्यात येणार आहेत़ एकाही ठिकाणी वारकरी उघड्यावर शौचास बसू नयेत, याची दक्षता घेतली जाणार आहे. एकूणच यंदा अवघी वारीच निर्मळ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी माहिती विभागीय आयुक्त एस़ चोक्कलिंगम यांनी दिली.आषाढी यात्रा आढाव्याबाबतची बैठक गुरुवारी चोक्कलिंगम यांनी घेतली. या वेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, प्रांताधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते़चोक्कलिंगम म्हणाले की, ‘यंदा पारंपरिक पद्धतीचे चर खोदून करण्यात येणारे तात्पुरते एकही शौचालय नसेल़ याची सक्त ताकीद स्थानिक प्रशासनाला दिली आहे़ त्यामुळे गावात थेट जमिनीत घाण होणार नाही. केवळ पंढरपूरच नव्हे, तर पालख्या निघण्याच्या ठिकाणापासून ते पंढरपूरपर्यंत जिथे-जिथे पालख्यांचा मुक्काम आहे, त्या सर्व ठिकाणी प्री-फॅब्रिकेटेड शौचालये असतील़ त्यामध्ये आळंदीपासून पंढरपूरपर्यंत ज्ञानदेवांच्या पालखी मार्गावर एकूण ५०० तर देहूपासून पंढरपूरपर्यंत तुकोबांच्या पालखी मार्गावर ३०० प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उभी करण्यात येतील. या सर्व शौचालय उभारणीच्या कामासाठी तिन्ही जिल्ह्यांचे मिळून पुणे जिल्हा परिषदेकडून निविदा काढण्यात आली असून, एकाच कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येणार आहे.पालखी मार्गावरील भंडीशेगाव, पिराची कुरोली, माळशिरस या पालखी तळावर मुरुमीकरण करण्यात येणार आहे. पंढरपुरातील गजानन महाराज मठ ते भक्ती मार्ग चौक, मध्य प्रदेश भवन ते सांगोला चौक, महात्मा फुले चौक ते गोपाळपूर आणि एमटीडीसी भक्तनिवास ते सांगोला चौक हे रस्ते आषाढी एकादशीपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)दोन हजार शौचालये वाढणारपालख्या आणि दिंड्याच्या मुक्कामासाठी विकसित करण्यात आलेल्या ६५ एकर परिसरात यंदा नव्याने ११३ शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. तीर्थक्षेत्र विकास निधीतून शहराच्या विविध भागांत १३०० शौचालये, प्री-फॅब्रिकेटेड १५०० शौचालये उभी राहतील, तर विविध मठांमध्ये तब्बल ४००० शौचालय सध्या आहेत़ यंदा त्यात वाढ होऊन ६ हजार ९१३ शौचालये असतील़ गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा दोन हजार शौचालये वाढणार आहेत़
पालखी मुक्कामी प्री-फॅब्रिकेटेड शौचालये
By admin | Published: June 24, 2016 5:23 AM