खळद : हडपसर-सासवड-जेजुरी पालखी महामार्ग दुरुस्तीअभावी मृत्यूचा सापळा बनला असून, यामध्ये खळद गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.येथे सेंट जोसेफ इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. येथे तालुक्यातील जवळपास हजारो मुले शिक्षणासाठी येतात. रस्त्यावरही मोठी वाहतुकीची वर्दळ असते, असे असताना या रस्त्याचे चौपदरीकरण होत या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजंूच्या शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन त्यावर काम करण्यात आले. मात्र मध्यभागी मूळ रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने उंचवटा व मध्यभागी जवळपास तीन ते चार फुटाचा खोलगट भाग यामुळे वाहनचालकांची गडबड होत असून अपघात होत आहेत. याबाबत आजपर्यंत येथे ज्या-ज्यावेळी अपघात होतात त्या- त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते. पण याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. येथे अनेकांचे जीव गेले. पण या विभागातील एकही अधिकारी साधी पाहणी करायलाही आला नाही. पालखी सोहळ्यापूर्वी या रस्त्यावर दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले; पण यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत सर्व काम निकृष्ट दर्जाचे झाले, याला सार्वजनिक बांधकाम विभागानेही पाठिंबा देत खतपाणी घातल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी. यासाठी संतप्त नागरिकांनी खड्ड्यात झाड लावून याचा निषेध केला. पुढील आठवड्यात येथे भव्य रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.(वार्ताहर)>बुधवारी (दि.१ मार्च ) येथे इनोव्हा व सफारी या गाड्यांची धडक होऊन इनोव्हा गाडीने रस्त्याच्या बाजूला जवळपास तीन ते चार पलट्या खाल्ल्या. यामध्ये या गाडीतील सांगोला जि. सोलापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनिफ शेख व त्यांचे सहकारी पोलीस नाईक दत्ता येलापल्ले जखमी झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. तर एक महिला जखमी किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
पालखी मार्ग मृत्यूचा सापळा
By admin | Published: March 04, 2017 1:04 AM