मुंबई : वडाळ्यातील बहुचर्चित वकील पल्लवी पूरकायस्थ हत्याप्रकरणातील फरार सुरक्षारक्षक सज्जाद मुगल उर्फ इलियास पठाणला मंगळवारी जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पॅरोलवर बाहेर पडलेला सज्जाद फरार झाला होता. त्यानंतर, तो वेश बदलून जम्मू-काश्मीरच्या रस्त्यांवर मजुरीचे काम करत असल्याची माहिती त्याच्या चौकशीतून उघड झाली.मुंबईतील वडाळा परिसरातील हिमालयन हाइट्स या सोसायटीत राहणारी पल्लवी ही एका खासगी कंपनीत वकील म्हणून कार्यरत होती. इमारतीचा सुरक्षारक्षक असलेल्या सज्जादने ९ आॅगस्ट २०१२ रोजी संधी साधून, पल्लवीच्या राहत्या घरी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला, म्हणून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात गुन्हे शाखेने शिताफीने सज्जादला बेड्या ठोकल्या. ३० आॅक्टोबर २०१२ रोजी सज्जादवर ४३५ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सज्जादला ७ जुलै २०१४ मध्ये न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती.मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या सज्जादने आईची प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करत, पॅरोलचा अर्ज केला. जम्मू-काश्मीरच्या स्थानिक पोलीस ठाण्याला रोज हजेरी लावण्याच्या अटीवर २८ फेब्रुवारी २०१६ रोजी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. मार्चअखेर त्याने स्थानिक पोलिसांना हजेरीच दिली नसल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड पोलिसांनी सज्जाद फरार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण तपासासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.मुंबई गुन्हे शाखाही सज्जादचा शोध घेत होती. तो जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. तेथे तो स्वत:ची ओळख लपवून राहत असल्याने, त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या. गेले अनेक दिवस मुंबई गुन्हे शाखा तेथे तळ ठोकून होती. त्यांनी तेथे स्वत:चे खबरी तयार केले.पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निकम यांचे सहकारी पोलीस अंमलदार दयानंद कांबळे, संदीप कांबळे, संदीप तळेकर यांनी सज्जादचा शोध घेत, त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर, मंगळवारी त्याला मुंबईत आणले. बुधवारी त्याचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
पल्लवी पूरकायस्थ हत्याप्रकरण : फरार सुरक्षारक्षक वर्षभरानंतर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:34 AM