नवी मुंबई : बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे पामबीच मार्गावर एपीएमसी येथे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्या ठिकाणच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहने पामबीच मार्गावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे इतर वाहनांना वाहतुकीला अडथळा होऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही सातत्याने त्या ठिकाणी घडत आहेत.शहरातला जलदगती मार्ग म्हणून पामबीच मार्ग प्रसिद्ध आहे. या मार्गामुळे सीबीडी ते कोपरखैरणे दरम्यानचे अंतर काही मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. तर ठाणे-बेलापूर मार्गावरील सततची वाहतूककोंडी टाळण्यासाठी अनेकजण कोपरी येथून पामबीच मार्गे सीबीडीच्या दिशेने जातात; परंतु या प्रवासादरम्यान अनेकांना पामबीच मार्गाच्या सुरुवातीलाच वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पामबीच गॅलरिया मॉल ते अरेंजा सर्कल दरम्यान पामबीच मार्गालगतच गॅरेजची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येणारी चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केलेली असतात. यामुळे दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या या वाहनांकडून मार्गाचा दोनपदरी भाग गॅरेजच्या विळख्यात गेला आहे. पर्यायी उर्वरित एकपदरी मार्गाच्या जागेतून इतर वाहनांना मार्ग काढत पुढे जावे लागत आहे. या प्रकारामुळे त्या ठिकाणी यापूर्वी किरकोळ अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यानंतरही पामबीच मार्गावरील गॅरेजचे अतिक्रमण हटवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, वेळीच पामबीच मार्गावरील ही अवैध पार्किंग बंद न झाल्यास त्या ठिकाणी भीषण अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
पामबीच मार्ग बेकायदा गॅरेजच्या विळख्यात
By admin | Published: February 27, 2017 2:08 AM