बावडा : वकीलवस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीचा गचाळ कारभारदेखील पाणीपुरवठा करण्यास कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक दिवसांपासून चालू असलेला पाण्याचा टँकर अचानक बंद केल्याने आणखीनच बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांनी या वेळी हंडा मोर्चा काढला.वकीलवस्ती (ता. इंदापूर) येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद केल्यापासून पुन्हा पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यातच शेटफळ तलावातून गावासाठी जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन पाणीपुरवठा करण्यासाठी आणली आहे. परंतु, अनेक दिवसांपासून तिही बंद अवस्थेत आहे. ती दुरुस्त करण्यासाठी ना ग्रामपंचायतीने प्रयत्न केले, ना प्रशासनाने. त्यामुळे विनाकारण ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. मोर्चात भांडी घेऊन ग्रामस्थ सहभागी झाले होते. महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, शिवसेना तालुका उपप्रमुख अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राजेंद्र भोळे, निसार शेख, ग्रामपंचायत सदस्य अजित भोळे, वनिता भोसले, राजेंद्र कोरटकर, माऊली कोरटकर, राणी घोगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार यांच्या वतीने महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. एम. मिसाळ यांनी निवेदन स्वीकारले.या वेळी तलाठी बंडू आवाड, गौतम गायकवाड आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते. बावडा दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता. यात नागरिकांचा मोठा सहभाग होता.(वार्ताहर)>या वेळी वकीलवस्ती या गावातील गायरान जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करून घरे, बंगले, वीटभट्ट्या, विहिरी, कूपनलिका असून त्यांमध्ये बिनधास्तपणे शेती पिकवली जाते. याकडेही शासनाने लक्ष देण्याची मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.
पाण्यासाठी हंडा मोर्चा
By admin | Published: August 23, 2016 1:26 AM