- संकेत सातोपे
मुंबई : लढण्याची उर्मी असेल, तर हातातली साधी दगड-वीटसुद्धा प्रभावी शस्त्र ठरू शकते, याचा प्रत्यय शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य संस्थापनेसाठी लढणाऱ्या मावळ्यांची शस्त्र पाहताना येतो. तोफा- बंदुकादी तत्कालीन आधुनिक नि महागड्या शस्त्रास्त्रांचा वापर न करताही शिवरायांनी शेकडो लढाया मारून दाखवल्या. त्यांच्या सैन्यात 'पंचहत्यारी' ही संकल्पना होती. त्यानुसार युद्धावर निघणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे पाच प्रमुख शस्त्र असत. आज शिवजयंतीनिमित्त जाणून घेऊयात याच प्रमुख शस्त्रांविषयी...
तिजोरीला परवडणारी, तरीही प्रभावी अशी तलवार, ढाल, भाला, कट्यार आणि गोफण ही पाच शस्त्र मावळ्यांकडून वापरली जात. कंबरेला खोचलेली गोफण, कट्यार, उजव्या हातात भाला, डाव्या हातात म्यानबंद तलवार नि पाठीला ढाल, असे मावळ्याचे चित्र आपण पाहिलेलं असेल. यातील गोफणीसारखे अस्त्र तोफा, बंदुका, तीर-कमान यांसारख्या खर्चिक अस्त्रांना पर्याय म्हणून उपयोगात आणले गेले. पन्हाळ्याच्या वेढ्यात किंवा अन्य गडांवरही चालून येणाऱ्या गनिमाला थोपवून धरण्यासाठी गोफणीतून भिरभिरत जाणारे दगड- धोंडे परिणामकारक ठरत होते.
शिवरायांचे सैन्याच्या शस्त्रांकडे जातीने लक्ष असे. भाल्यासाठी उत्तम काठ्या कुठे मिळतील, त्या कशा वापराव्यात यासंबंधी आपल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पत्र प्रसिद्ध आहे.
मराठ्यांच्या ढाल- तलवार, कट्यार या शस्त्रांमध्येही खूपच साधेपणा आणि केवळ उपयोगिता हेच तत्व पाळलेले दिसते. शस्त्रांवर सोन्याचा मुलामा, हस्तिदंती नक्षीकाम, असली मुघली थेरं स्वराज्याला परवडणारी नव्हती. त्यामुळे पातळ पण मजबूत पात्याची काहीशी बाकदार तलवार, एकसंध - ओतीव कट्यार आणि कासवाची पाठ, प्राण्यांचे चामडे किंवा लोखंडाची ढाल, असे या शस्त्रांचे स्वरूप होते. त्यामुळे सजावट, नक्षीकाम नसलेली पण मजबूत पोलादी शस्त्र म्हणजे मराठ्यांची शस्त्र, अशी त्यांची इतिहासात ओळख आहे.
दांडपट्टा हाही तलवारीचाच एक मराठमोळा आविष्कार आहे. दुधारी पात्याची आणि ज्याच्या मुठीत कोपरापर्यंत हात घालता येतो अशी तलवार म्हणजे पट्टा किंवा दांडपट्टा. सामान्य तलवारीपेक्षा काहीसे लांब पाते आणि ते फिरवण्याची वैशिष्ट्यपूर्ण कला यामुळे संख्येने जास्त शत्रूची वाट रोखून धरण्याच्या कामी हे शस्त्र अत्यंत प्रभावी ठरले आहे. (उदा. बाजीप्रभू देशपांडेंची पावनखिंडीतील लढाई)विटा हासुद्धा भाल्याचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार. त्याला पाठीमागे जोडलेल्या दोरामुळे तो शत्रूवर फेकून परत घेता येत असे. पन्हाळा किल्ल्यावर वीर शिवा काशीद यांचा पुतळा आहे, त्यांच्या हाती हे अजब शस्त्र - अस्त्र पाहायला मिळते.असेच वेगळ्या धाटणीचे आणखी एक मराठी शस्त्र म्हणजे माडू! ढालीच्या मागच्या बाजूला टोकदार सांबरशिंग किंवा धारदार पाते लावून ढाल या बचावाच्या शस्त्राचा मराठ्यांनी वार करण्यासाठीही वापर केला. त्यामुळे ढाल एकाच वेळी बचाव तसेच हल्ला करण्यासही उपयोगी पडत असे.
ढाल - तलवार, कट्यार, भाले या किमान खर्चातील प्रभावी शस्त्रांमध्ये कल्पक बदल घडवून आणि ती प्रभावीपणे वापरण्याची कला आत्मसात करून, मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. हे स्वप्न मराठी डोळ्यांत पेरणाऱ्या आणि ते साकार करण्यासाठी गवताच्या पात्यांतून तलवार- भाल्याच्या पात्यांचे पीक काढणाऱ्या द्रष्ट्या शिवछत्रपतींची आज जयंती! त्यांच्या कर्तृत्वास त्रिवार मुजरा!!