लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानक व अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी सकाळपासून सहा तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे मनमाड जंक्शनवरून मुंबईला जाणारी चाकरमान्यांच्या सोईची पंचवटी व गोदावरी या दोन्ही जलद वेगाने जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या सहा लाईनवर पुलावर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत ६ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पादचारी पुलाच्या कामाकरिता ४.३० तासांचा मेगाब्लॉक देण्यात आला आहे. यामुळे मुंबईला जाणारी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. हावडा-मुंबई एक्स्प्रेस ही नियमीत साडेअकराच्या निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने धावणार आहे. राजेंद्रनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळ साडेअकरा ऐवजी दुपारी २ वाजता सुटणार आहे. गोरखपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वाबारा ऐवजी दुपारी २.२० वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस निर्धारित वेळ सव्वा बारा ऐवजी दुपारी १.४५ वाजता, वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी २ वाजता, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस निर्धारित वेळ दुपारी १.३० ऐवजी ३.३० वाजता, वाराणसी-सीएसटी मुंबई महानगरी एक्स्प्रेस दुपारी सव्वादोन ऐवजी ३.४५ वाजता, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ३.४५ वाजता, पाटलीपुत्र एक्स्प्रेस दुपारी १.३० ऐवजी ४ वाजता मुंबईला पोहचणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ही रविवारी सकाळी निर्धारित वेळ १०.५५ ऐवजी १२ वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.१० ऐवजी १२.१५ वाजता, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस निर्धारित वेळ ११.०५ ऐवजी ११.५० वाजता मुंबईहून सुटणार आहेत. ‘सेवाग्राम’ला सीएसटीपर्यंत नो-एन्ट्रीनागपूर जंक्शनवरून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाशिकमार्गे जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी (दि.२५) सकाळी टर्मिनेट केली जाणार आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी (दि.२५) सकाळी साडेसात वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर टर्मिनेट केली जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून नागपूरला रवाना होणार आहे.
पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस रद्द : मेगाब्लॉक
By admin | Published: June 24, 2017 9:40 PM