ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - नियमबाह्य फी वसूलीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात छात्रभारतीच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घेराव घातला.
बारावीच्या विद्यार्थ्यांकडून नियमबाह्यरीत्या पूर्व परीक्षा फी वसूल करण्यात येत असून महाविद्यालयाकडून १३० रुपये इंटरनेट फी घेतली जात असताना ऑनलाईन शिष्यवृती अर्ज भरण्यासाठी वेगळी द्यावी लागते अथवा बाहेरील सायबर कॅफेतून अर्ज भरावे लागत असल्याने छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या दालनात प्रवेश केला. यावेळी प्राचार्य बी.एस. जगदाळे कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या गोंधळाची माहिती मिळताच प्राचार्य महाविद्यालयात दाखल झाले असता विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घेराव घालून त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे आवाहन केले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसदर्भात शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण मंडळाचे अधिकारी यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे..