पुणे : मुलाने केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकत चुलत्याच्या अंत्यविधीला मज्जाव केला. यासोबतच बहिष्कार मागे घेण्यासाठी एक लाख रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले. ही घटना ८ एप्रिल रोजी दुपारी धनकवडी येथे घडली. मानसिक धक्का बसलेल्या शंकर हरीराम डांगी (वय ५४, रा. वडगाव बुद्रुक) यांनी रविवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तेजाराम चुन्नीलाल डांगी (रा. वारजे), दीपाराम चुन्नीलाल डांगी, मोतीलाल चुन्नीलाल डांगी, विजय दीपाराम डांगी, बालकिसन मोहनलाल डांगी, बाबुलाल मांगिलाल डांगी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादींचे नातेवाईक असून पंचायतीचे पंच आहेत. शंकर डांगी यांचे चुलते आणि बाबुलाल डांगी यांचे वडील मांगिलाल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीदरम्यान चुलत भाऊ बाबुलाल आणि अन्य पंचकमिटी सदस्यांनी ‘तू येथून निघून जा. तुला ओळबा (वाळीत) आहे.’ असे सांगितले. त्यावर कारण विचारले असता शंकर यांच्या मुलाने पाच वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केल्याचे कारण सांगण्यात आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. चुलत्याच्या शेवटच्या काळात सेवा आणि दवाखान्याचा खर्च आपणच केल्याचे शंकर यांनी सांगितले. त्यावेळी जातीमध्ये परत यायचे असल्यास एक लाख रुपये दंड भर, असे सांगण्यात आले. प्रतिप्रश्न केला असता त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. मानसिक धक्का बसलेल्या शंकर यांनी रविवारी रात्री उशीरा याप्रकरणी फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
पंचायतीने कुटुंबाला टाकले वाळीत
By admin | Published: April 19, 2016 4:15 AM