ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 3 - केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी, आॅडिट आक्षेप निकाली, पदाधिकारी व अधिका-यांचा समन्वय, सर्व समित्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी, कार्यालयीन स्वच्छता, आस्थापनाविषयक सर्व बाबींची पूर्तता असलेल्या लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर उत्कृष्ट पंचायतराज संस्थेचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. २०१६-१७ च्या कामावर राज्यस्तरीय समितीने हे पारितोषिक घोषित केले आहे.
राज्यस्तरीय पडताळणी समितीने दिलेल्या अहवालानुसार मूल्यांकन समितीच्या बैठकीत उत्कृष्ट पंचायतराज संस्थांची निवड करण्यात आली आहे. रोख ३० लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक सोलापूर जिल्हा परिषद तर तृतीय पारितोषिक जळगाव जिल्हा परिषदेला जाहीर करण्यात आला आहे. लातूर जिल्हा परिषदेने केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली आहे. याशिवाय आॅडिटवर येणारे आक्षेप निकाली काढली आहेत. कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. पदाधिकारी व अधिका-यांच्या समन्वयातून कामकाज करण्याची परंपरा लातूर जिल्हा परिषदेत पूर्वीपासूनच चालत आली आहे. सर्वसाधारण सभा, विषय समितीची सभा, स्थायी समितीच्या सभेतील कामकाज, कार्यालयीन स्वच्छता, आस्थापना विषयक सर्व बाबींची पडताळणी समितीने पाहणी केली होती. या सर्व बाबी लातूर जिल्हा परिषदेचे कामकाज राज्यात आघाडीवर असल्याचा अहवाल समितीने दिल्यामुळेच लातूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या क्रमांकावर आली आहे. लवकरच मुंबई येथे सदरील पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सामूहिक कामकाजातून यश : सीईओ माणिक गुरसळ-
लातूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पद्धत राज्यात आदर्श आहे. या ठिकाणी सर्व अधिकारी, कर्मचारी एकमेकांच्या सहकार्याने कामे करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदाधिकारी हे अधिका-यांना समजून घेत समन्वयातून कामकाज करीत असल्याने लातूरच्या जिल्हा परिषद प्रशासनाची ख्याती आहे. नुकतीच राज्यस्तरीय पडताळणी समितीने लातूर जिल्हा परिषदेची पडताळणी केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार लातूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली. हे पदाधिकारी व कर्मचा-यांच्या सामूहिक कामकाजाचे यश असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.