संजीव साबडेबऱ्याच वर्षांपूर्वी मराठीतील एक वग खूप गाजला होता. गोपीनाथ सावकार यांनी तो रंगमंचावर आणला होता आणि अभिनेते अशोक सराफ यांची नाटक, चित्रपट यांतील एंट्री त्या वगातूनच झाली होती. त्या वगाचं नाव होतं, ‘बोलायचंच तर कमी का?’ सध्या राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची जी भाषणं होत आहेत, ती पाहता, बोलायचंच, तर कमी का? या वगनाट्याची आठवण होते. सारेच नेते भसाभस बोलत सुटले आहेत. तोंडाला येईल ते, त्या क्षणी आठवेल ते बोलत सुटले आहेत आपले नेते. ‘शब्दवीर, वाचावीर ऐसे पुढारी थोर थोर...’ या ओळींची आठवण होते. मुख्यमंत्र्यांची मुंबईभर भलीमोठी होर्डिंग्ज लागली आहेत. त्यावर त्यांचं छायाचित्र, प्रत्येकावर एक आश्वासन आणि आणि त्याखाली हे आपण नक्की पूर्ण करणार, हे स्पष्ट होण्यासाठी ‘हा माझा शब्द’ असंही लिहिलंय. दुसरीकडे शिवसेनेच्या होर्डिंग्जवर उद्धव ठाकरे ‘नुसत्या शब्दांनी मुंबईचा विकास कसा होईल,’ असा सवाल विचारताना दिसत आहेत.पण शब्दांचा भडिमार सभांतूनही सुरू आहे. आधी निवडणूक जाहीरनामा असायचा. मग वचननामा हा शब्द आला, मग वचकनामा आला. आता तर भाजपाने स्टॅम्पपेपरवरच आश्वासनांची खैरात वाटली आहे. जाहीरनामा, वचननामा, वचकनामा हे सारे नुसते शब्दांचे फुगे, तसंच स्टॅम्पपेपरचं. असा स्टॅम्पपेपर कुठंच चालणार नाही. पण सारी स्थिती शब्द बापुडे केवळ वारा या मर्ढेकरांच्या कवितेप्रमाणे. या कानानं ऐकायचे आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे, याची राज्यातल्या मतदारांना सवयच झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत शब्दांचे बुडबुडे फारच मोठे आहेत. मुंबईत नरिमन पॉइंट ते बोरीवली हे अंतर २0 मिनिटांत पूर्ण होईल, असं मेट्रो आश्वासन मुख्यमंत्री देताहेत, तर स्वत:चं धरण बांधणारी मुंबई महापालिका पहिली असं उद्धव ठाकरे सांगताहेत. वैतरणेवर मोडकसागर धरण बांधलं, तेव्हा उद्धव ठाकरे जन्मलेही नव्हते. पण त्यांचंही ते श्रेय घ्यायला उठले आहेत. यंदा महापालिका निवडणुकांत लढाई उमेदवारांची दिसतच नाही. फडणवीस विरुद्ध ठाकरे विरुद्ध ठाकरे असेच शब्दबंबाळ वातावरण आहे. नाही म्हणायला नितीन गडकरी, मनोज तिवारी, सुप्रिया सुळे, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्य शिंदे असे पाहुणे कलाकार डायलॉग मारून जातात. पण शब्दांच्या फटाक्यांची आतशबाजी करण्याचं सारं काम फडणवीस आणि ठाकरे बंधूंनीच हाती घेतलंय. पूर्वी झोपडपट्टीला पाणी पुरवू, आतमध्ये पक्के रस्ते बांधू, रेशन कार्ड मिळवून देईन, एरियातला कचरा साफ करू अशी छोटी आश्वासनं असत आणि पालिका तसंच जिल्हा परिषद मतदारसंघात तेवढी पुरेशी वाटत. पण आता फारच मोठ्या उड्या सुरू आहेत. पारदर्शक कारभार, भले मोठे रस्ते, भ्रष्टाचारमुक्त शहर, चोवीस तास पाणी, चांगले रस्ते नसल्यास पथकर नाही, असं मुख्यमंत्री सांगताहेत. ठाकरे केलेल्या, न केलेल्या कामांची जंत्री आपल्या नावावर जमा करताहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र त्या दोघांना खोटं खोटं नाटक म्हणून डिवचताहेत, असे शब्दांचे खेळ. निवडणुकांनंतर हेच सारे गळ्यात गळे घालून दिसतील. तोपर्यंत त्यांचे ‘बोलायचंच, तर कमी का?’ अशा वगनाट्याप्रमाणे चाललंय. आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें, शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन शब्दें वांटूं धन जनलोकां तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्द चि गौरव पूजा करूं असं संत तुकारामांनी लिहिलंय. शब्दांची शस्त्रे जोरात पारजणं सुरू आहे. शब्दांचे धन जनलोका वाटू असंही ते म्हणतात. ते अगदी खरंय. केवळ मतदारांना शब्दांचं धन वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकदा निवडून आल्यावर धन भलतीकडे जातं आणि शब्द तर त्यांच्याही आठवणीत राहात नाहीत.
पंचनामा - शब्द बापुडे केवळ वारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 1:42 AM