अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करणे विदर्भातील विद्यार्थी, शेतकर्यांना गैरसोयीचे ठरणार असून, मागणी नसताना हे विभाजन कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी गुरुवारी राज्यपालांना निवेदन दिले आहे. त्यांनी या निवेदनात अनेक तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. या कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात जिल्हानिहाय व पीकनिहाय संशोधन केंद्र असून, पूर्व विदर्भातील भात पिकासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र सिंदवाईला आहे. प्रत्येक जिल्हय़ातील माती व पीक पद्धती बदलत असल्याने त्यादृष्टीने या कृषी विद्यापीठाने संशोधन केंद्राची रचना केली आहे. सर्वच दृष्टीने संशोधनाचे काम सुरळीत सुरू आहे असे सर्व अनुकूल असताना या विद्यापीठाचे विभाजन कशासाठी, असा प्रश्न डॉ. खड्डकार यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे. पारंपरिक विद्यापीठाच्या दोन ते तीन हजार विद्यार्थीसंख्येपेक्षा या कृषी विद्यापीठाची विद्यार्थी संख्या पाच हजाराच्या आत असून, काम सुरळीत सुरू आहे. दुसरीकडे नागपूर विद्यापीठाचे विभाजन करू न गडचिरोलीला नवे शिक्षण विद्यापीठ देण्यात आले. तथापि, आजपर्यंत या विद्यापीठाला जागा मिळाली नसल्याने या विद्यापीठाचे काम नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्रातूनच सुरू आहे. विदर्भात दोन कृषी विद्यापीठे झाली तर मनुष्यबळ, संसाधने, इमारती असा अफाट खर्च लागेल. राज्यावर अगोदरच तीन लाख कोटीचे कर्ज असताना मग नवीन विद्यापीठ निर्माण करण्याचा उद्देश काय, हे नमूद करताना त्यांनी या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, कर्मचारी किंवा कोणत्याही सामाजिक, राजकीय संघटनांनी विभाजनाची मागणी केलेली नसताना शासनाने विभाजन समिती स्थापन केली असून, विद्यापीठ विभाजनाची तयारी सुरू केली आहे. याच कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण करावे, नागपूर येथे संशोधन केंद्र निर्माण करू न या कृषी विद्यापीठाचे विभाजन टाळावे, असेही डॉ. खडक्कार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पंदेकृविचे विभाजनच गैरसोयीचे !
By admin | Published: June 26, 2015 12:03 AM