मालगाव : पांडुरंगाच्या पंढरीची वाट अधिकच बिकट झाली आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावर असंख्य प्रमाणात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे थेट मृत्यूशी सामना करण्याची वेळ वाहनधारकांवर येऊ लागली आहे. दररोज चार ते पाच अपघाताच्या घडणाऱ्या घटनांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांतून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी कधी मिळायचा तेव्हा मिळो, त्यापूर्वी संबंधित विभागाने किमान मृत्यूचे भय वाढविणारे खड्डे मुरुमाने तरी भरून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.मिरज-पंढरपूर रस्ता सध्या मृत्यूचे भय वाढविणारा ठरला आहे. तासगाव फाट्यापासून या रस्त्याच्या दुर्दशेला सुरुवात होते. या राष्ट्रीय महामार्गावर सध्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. खड्ड्यांची संख्या अगणित वाढली आहे. हे खड्डे किमान दोन फुटापेक्षा जादा खोलीचे आहेत. कोणता खड्डा चुकवायचा, हाच वाहनधारकांसमोर प्रश्न पडतो. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अवजडपणामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मालवाहतूक वाहनधारक त्रस्त आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून अपघात घडले आहेत. ही मालिका आजही सुरू आहे. रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दोनचाकी वाहनांचे अपघात होऊन पाय मोडणे अशा गंभीर दुखापती होण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होणारे दररोज पाचहून अधिक रुग्ण भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल होत असल्याचे तेथील नोंदीवरून दिसून येते. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेऊन अपघातातील गंभीर जखमी झालेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. उपचार घेऊनही काहींना केवळ अपघातामुळे अपंगत्व आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मिरज-पंढरपूर रस्त्याच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने या राष्ट्रीय मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी, निधी मिळून प्रत्यक्ष डांबरीकरणाच्या कामाला कधी सुरुवात व्हायची तेव्हा होवो, त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वच प्रकारच्या वाहनधारकांची सत्त्वपरीक्षा न पाहता, किमान रस्त्यात वाढत असलेले खड्डे मुरुमाने तरी भरून घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वारकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी!कार्तिक एकादशीसाठी मिरज-पंढरपूर मार्गावरून कर्नाटक, कोकणसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी पंढरपूरकडे पायी दिंडीने मार्गस्थ झाले. या प्रवासात त्यांना बिकट झालेल्या पंढरीच्या वाटेवर जीव मुठीत घेऊन पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ व्हावे लागले. रात्री उशिरापर्यंत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांनाही खड्ड्यांमुळे जखमी व्हावे लागले. मिरज-पंढरपूर रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दिंड्यांचे प्रमाण अधिक आहे. वारीपूर्वी या रस्त्याची शासनाने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. पंढरी वाटेच्या झालेल्या प्रचंड दुरवस्थेबाबत वारकऱ्यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली.
पंढरीची वाट बनली बिकट
By admin | Published: November 05, 2014 9:36 PM