दीपक होमकर ल्ल पंढरपूरजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल १० हजार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साडेचार तास राबून पंढरपूर चकाचक केले खरे; मात्र ती चकाकी एक दिवसात पंढरपूर नगर परिषदेने घालविली असून, चंद्रभागा वाळवंटासह मुख्य पेठांमध्ये पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे़ परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांची विशेष स्वच्छता मोहीमच आता कचऱ्यात जमा झाल्याचे दिसून येत आहे.शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सुमारे ८० टन कचरा एकत्रित केला होता़ त्यातील ४० टन कचरा डेपोत टाकला असून, उर्वरित ४० टन कचरा त्याच दिवशी सायंकाळपर्यंत डेपोत टाकण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या बैठकीला नगर परिषदेचे अधिकारीही उपस्थित होते. मात्र मोहीम संपल्यानंतर गेल्या दोन दिवसांत पंढरपूर नगर परिषदेने जमा केलेला कचरा उचलला तर नाहीच शिवाय नियमित साफसफाईही केली नाही. त्यामुळे आज दोन दिवसांचा कचरा रस्त्यांवर तसाच पडून होता.अभियान संपल्यावर पाऊस आला. त्यामुळे कचरा उचलण्यात व्यत्यय आला. शिवाय रविवारी सफाई कर्मचाऱ्यांनाही सुट्टी असल्याने कचरा उचलला गेला नाही़ त्यामुळे आज वाळवंट परिसरामध्ये चार घंटागाड्या लावून कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. पसरलेला कचराही आमचे कर्मचारी पुन्हा एकत्र करीत आहेत. - शंकर गोरे, मुख्याधिकारी, पंढरपूर नगर परिषदच्चंद्रभागा वाळवंट आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांसाठी नव्याने नियोजन करण्यात येणाऱ्या ६५ एकर परिसरामध्ये विशेष परिश्रम घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. विशेषत: वाळवंटामध्ये वाळूत रुतून बसलेला कचरा, कपडे आणि निर्माल्यही कर्मचाऱ्यांनी अक्षरश: शोधून शोधून काढले व एकत्र करीत तेथील कचऱ्यांच्या कुंडांमध्ये जमा केले होते. त्यामुळे वाळवंटातील दोन कचऱ्याचे मोठे कुंड कचऱ्याने भरून वाहिले; मात्र अद्यापही नगर परिषदेने कुंडांतील कचरा डेपोत नेलाच नाही.
पंढरपुरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य!
By admin | Published: April 14, 2015 1:23 AM