पंढरपूर : वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याबाबत आरखडा तयार करण्यात आला आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शन रांगेसाठी सात मजली श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप बांधण्यात आला होता. त्या दर्शन मंडपातील एकच मजला दर्शन रांगेसाठी उपयोगात येत होता. त्यामुळे त्या जागेवर नवी इमारत उभारून भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासन दरबारी सादर केला आहे.
१९८७मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हा सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुमारे ३५ हजार भाविकांची क्षमता आहे. मागील वर्षापासून दर्शन रांगेसाठी या संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचा वापर सुरू होता. परंतु, काही भाविक मंडपातून खाली पडण्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या होत्या. त्याचबराबेर दर्शन मंडपाचे पाच मजले चढणे-उतरणे जिकरीचे होत असल्याने २०१८पासून यातील फक्त पहिल्याच मजल्याचा दर्शन रांगेसाठी वापर कण्यात येत आहे. यामुळे दर्शन मंडपातील इतर मजल्यांचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे हा दर्शन मंडप पाडून नवीन इमारत बांधणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासनाकडे दिला आहे. अस्तित्वातील दर्शन मंडप पाडल्यानंतर त्याठिकाणी ११ हजार चौ. मी. जागा उपलब्ध होत आहे.
असे आहे नियोजननव्या इमारतीत मंदिर समितीचे प्रशासकीय कार्यालय, पार्किंग, अग्निशामक यंत्रणा, रुग्णवाहिका पार्किंग, पोलीस चौकी, व्हीआयपी विश्रामगृह करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे विकास आराखड्यात नमूद केले आहे. परंतु, याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.