मुंबई: देशभरात पाच राज्यांच्या निवडणूक निकालासह पोटनिवडणुकींचा निकालही (Pandharpur Election Results 2021) लागत आहे. राज्यातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवतडे यांचा ३ हजार ७१६ मतांनी विजय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पराभूत झाले आहेत. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बेगानी शादी में अब्दुला दिवाना, हे मी आज पाहिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (devendra fadnavis criticizes sanjay raut over assembly election result)
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. बंगालमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही. बंगालशी शिवसेनेचा संबंध नाही. राष्ट्रवादीही हरली आहे. काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. ममतादीदींच्या यशामुळे यांना आनंद झाला आहे. मला संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य ऐकून एका गोष्टीच आश्चर्य वाटले. बेगानी शादी में अब्दुला दिवाना हे मी आज पाहिले. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्याचे काम करताना नेते दिसले, असा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे.
योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो
मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला आणि मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैर कारभाराला, गलथान कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचे काम हे पंढरपूरच्या जनतेने केले आहे. पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट
समाधान आवताडे यांचे अभिनंदन
आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीत ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाच्यावतीने तिन्ही पक्ष उतरले साम, दाम, दंड असे सर्व प्रकार त्या ठिकाणी वापरले गेले. प्रशासनाचा गैरउपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर केला पण हे सगळं केल्यानंतर देखील, त्या ठिकाणी भाजपाला जनतेने निवडून दिलं. मी निमित्त आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी नमूद केले.
विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं
दरम्यान, एक अतिशय जमिनीशी जुडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून गेली अनेक वर्ष राजकारणात ते आहेत आणि त्यांच्यासोबत प्रशांत परिचारक उमेश परिचारक हेही राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत राहीले आणि एक अतिशय चांगल्याप्रकारे त्या ठिकाणी रणनीती आखून ही निवडणूक लढवली गेली. आमच्या सर्व खासदार, आमदार व नेत्यांनी तिथे अतिशय चांगल्याप्रकारे लक्ष घातले व प्रचार केला, असेही फडणवीस यांनी सांगितले.