ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २ - पंठरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील पुरातन दगडी बांधकामाचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागातर्फे मंदिर संवर्धनाचे काम सुरू झाले आहे़ त्यामुळे मंदिराला प्राचीन मूळ स्वरुप येणार आहे़ शिवाय हे काम केवळ चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले़
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरातन दगडी बांधकाचे संवर्धन होण्यासाठी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता़ भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार आणि निदेशक (विज्ञान) डेहराडून यांच्या मान्यतेने पुरातत्वीय रसायनतज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले आहे़
मंदिरातील एक हजार ५५१ स्क्वेअर मीटर क्षेत्रावरील रंग काढण्यात येणार आहे़ एकूण तीन हजार २४९ स्क्वेअर मीटर क्षेत्रावर काम करून संवर्धन करण्यात येणार आहे़ यासाठी ३३ लाख ११ हजार ८०० रुपये खर्च येणार आहे़ तो खर्च पुरातत्व विभागास देण्यात आला आहे़
यावेळी पुरातत्वीय रसायन तज्ज्ञ अनिल पाटील, सहा़ अधीक्षक सुमितकुमार, लेखाधिकारी वाळूजकर, नित्योपचार विभागाचे हनुमंत ताटे यांच्यासह मंदिर समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
पुरातत्व विभागाच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा पूर्व दरवाजा, दीपमाळा व सभा मंडपाच्या भिंतींना दिलेला अॅक्रालिक रंग काढण्यात येणार आहे़ मंदिराचा गाभारा, मंडप, खांब, शिल्पे व भिंती या काळाच्या ओघात काळवंडल्या आहेत़ मंदिरातील दगडावर विविध प्रकारची घाण व रंग साचला आहे़तो रंग सुरक्षित रसायनांच्या साह्याने शास्त्रीय पद्धतीने काढण्यात येणार आहे़ गाभाºयाच्या बाहेरील भिंती स्वच्छ करून त्यावर सिलिकॉनचा जलरोधक लेप देण्यात येणार आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून नैमित्तीक पूजेमुळे भिंती व गाभाºयात काळजी, धूळ , तेलकटपणा वाढला आहे़ तो काढण्यासाठी मंदिरातील दगडाला कोणतीही इजा न पोहोचवता क्लेपॅक पद्धतीचा वापर केला जाईल़ काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे प्राचीन व नैसर्गिक मूळ स्वरुप दिसून येईल.