- अमोल अवचिते- पंढरपूर : आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंदू.... या संत तुकाराम महाराजांच्या पंक्तीप्रमाणे विठ्ठल भेटीची आस मनी घेऊन संतांसह शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वैष्णवांची पाऊले पंढरीत विसावली. माऊलींसह वैष्णवांना घेवून आषाढी एकादशीस माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत तुकाराम, संत सोपानदेव, संत ज्ञानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ आदी सुमारे शंभरहून अधिक संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशीरा पंढरीत दाखल झाल्या. पंढरपूर नगरीत संतांसह आलेल्या वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी एक वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडूरंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्यांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. दरम्यान दुपारी अडीच वाजता वाखरीहून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी ५.१५ वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. पंढरी समीप आल्याने दिंड्या- दिंड्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता तर काही दिंड्यात विविध खेळ खेळले जात होते. इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. आरतीनंतर माऊलींच्या पादुका श्रीमंत शितोळे सरकार यांच्या हातात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मनमोहक व सुंदर दिसत होते.
..............शुक्रवारी (आज ) आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणा सकाळचा विसावा घेऊन श्रींचे चंद्रभागा स्नान होणार आहे. शुक्रवार ते सोमवार या दिवसांत माऊलींची पालखी पंढरपूरमध्येच असणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी श्रींचे चंद्रभागा स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी भेट व गोपाळ काला होणार आहे. पंढरपूर मुक्कामानंतर १७ जुलैला पादुकांजवळ विसावा घेऊन पालखी परतीला निघणार आहे.