- अमोल अवचिते-
वाखरी : उभे, गोल रिंगणाचा सोहळा । साठवूनी पाहती डोळा । लीला करी अश्व भोळा । रिंगण करी ॥विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची पाऊले वेगाने पंढरीकडे वाटचाल करत आहेत. बाजीरावाची विहीर येथे दुसऱ्या उभे आणि चौथ्या गोल रिंगण सोहळ्यात वरुणराजाने हजेरी लावत वैष्णवांचा उत्साह वाढवला. भंडीशेगाव मुक्कामानंतर शेवटच्या मुक्कासाठी वाखरीला सकाळी पालखी मार्गस्थ झाली.यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती. पालखी मार्गावरुन संताच्या पालख्या पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. रिंगण सोहळे ठिकठिकाणी रंगत आहेत. भक्तजन हरि नामे झिंग । परमानंद भिजलेसे चिंब । गेल्या चार दिवसांपासून पावसाने हुलकवणी दिली होती. मात्र रिंगण सोहळ्यात पाऊस बरसल्याने वारकरी सुखावला. पावसामुळे चिखल झाला होता. चिखलात अश्व कसे दौड घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालखी पाच वाजता रिंगणात उतरताच भक्तांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. जसा पाऊस पडत होता तसा भक्तांचा उत्साह वाढत होता. अश्वांनी दौड घेताच एकच जल्लोष झाला. अश्वांच्या तीन फेऱ्यांमध्ये रिंगण सोहळा माऊली, माऊलीच्या जयघोषात रंगला. रिंगण पूर्ण होताच चिखलात देखील वेगाने धावला असे म्हणूत अश्वांचे कौतुक वारकरी करत होते. रिंगण सोहळ्यानंतर पालखी वाखरी येथे विसावली. गोल रिंगणात अश्वांच्या पुढे आणि उभ्या रिंगणात अश्वांच्या मागे रथापुढील चौदा नंबरच्या मरकळकर दिंडीतील पताका धारक धावतात. .............. वाखरी येथून पंढरपूर हाकेच्या अंतरावर असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी (आज) वाखरी मुक्कामानंतर पंढरपूर येथे माऊलींचा पालखी सोहळा विसावणार आहे. दुपारी पादुकांजवळ आरती होणार असून तिसरे उभे रिंगण होणार आहे.