विश्वास मोरे
देहूगाव: वर्षभर वारकरी वाट बघत असलेला क्षण अनुभवयाला मिळत असून आषाढी एकादशीकरिता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूनगरीतून पंढरीकडे प्रस्थान केले आहे. ३३३व्या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी आणि देहूकर सहभागी झाले असून इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरल्याचा भास होत आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट, खासदार श्रीरंग बारणे,अमर साबळे, आमदार बाळा भेगडे, देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, सोहळा प्रमुख अशोक निवृत्ती मोरे, विठ्ठल मोरे, सुनील दामोदर मोरे, दिलीप महाराज मोरे गोसावी आदी उपस्थित आहेत. यावेळी बापट यांनी बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली.
यंदा पालखीचा मान असलेल्या बाभुळगावकर आणि अकलूजचा अश्व दाखल झाला असून विणेकरी बाहेर पडले आहेत. आता काहीवेळा मंदिरा फेरा मारून पालखी जवळच्या इनामदार वाड्यात मुक्कामासाठी राहणार आहे.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी मार्गस्थ असल्याने देहूचा नूर केही वेगळाच आहे . सकाळपासूनच परिसरात भक्तीमय वातावरण असून आकाशात ढग दाटून आले होते. अधूनमधून पावसाचा शिडकावाही होत आहे. काल रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळी अकरा वाजल्यापासून उघडीप दिली आहे. देहूनगरीत प्रशासकीय, देवस्थान पातळीवर सज्जता जाणवत आहे. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने अन्नदान आणि वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे . कडेकोट बंदोबस्त मंदिर परिसरात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वारात धातूशोधक यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारी, भाविकांना आत येण्याचा मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=xmYgnF0GFQM&feature=youtu.be