धन्य आजि दिन । जालें संतांचे दर्शन॥जाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी॥
जालें समाधान । पायी विसावले मन॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा॥
पंढरपूर : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून खळाळत वाहणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह गुरुवारी चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह लाखो वैष्णव आज पंढरी नगरीत दाखल झाल्या आहेत .
पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होताना नगरवासीयांच्या वतीने संतांसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नाश्ता, चहा, पाणी वाटप करण्यात आले, त्याचबरोबर एवढे अंतर चालून आल्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी कॅम्प सुद्धा लावण्यात आले आहे. वारकऱ्यांना विठुरायाला भेटण्याची जी आस लागली होती ती पूर्ण होणार आहे. म्हणून वारकरी आनंदी आहे.पंढरपुरात सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे.भजन, कीर्तन, माऊली तुकारामाचा जयघोषात पंढरपूर न्हाऊन निघाले आहे. बुधवारी वाखरी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम झाला, भाविकांनी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती, लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. गुरुवारी एक वाजताच्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली वाटेत वारकऱ्यांनी झिम्मा, फुगड्या, खेळ खेळत होते. वारकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर वारकरी भावुक झाल्याचे दिसुन येत होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. दर्शनासाठी चोवीस तास मंदिर उघडे ठेवण्यात येणार आहे.पंढरपुरात भक्तीचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे.रस्ते भाविकांनी भरून गेले आहे.
शहरात चोख पोलीस बंदोबस्त पंढरपुरात लाखो वारकरी, भाविक आले असल्यामुळे शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस सर्व येणा?्या गाड्याची तपासणी करून सोडत आहेत. उत्साहाला उधाण विठुरायाला भेटण्यासाठी राज्यातून त्याचबरोबर परराज्यातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. शुक्रवारी एकादशी आहे, त्यामुळे पंढरपुरात उत्सवाचे वातावरण झाले आहे. पंढरपूर भक्त्यांच्या उत्साहाने न्हाऊन निघाले आहे .
- संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळ्यात ८९१ दिंड्या आहेत. उर्वरित प्रमुख पालखी सोहळ्यात मिळून ५०० च्या आसपास दिंड्या आहेत. यातील जास्त दिंड्या व पालखी सोहळे हे सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर व मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील आहेत. कोकण भागातील ही काही दिंड्या आहेत. राज्याबाहेरच शेजारच्या कर्नाटक,मध्यप्रदेश या राज्यातूनही शेकडो दिंड्या पंढरीला येऊन पोहचल्या आहेत. पंढरपूराला यात्रेचे स्वरूप वारकरी, भाविक यांच्यामुळे गेल्यामुळे पंढरपूरची बाजारपेठ सजली आहे. हार फुलांचे दुकान, प्रसाद, विविध प्रकारचे पेढे, खेळण्याची दुकाने, यामुळे संपूर्ण अवघी पंढरी सजली आहे.