वाखरी तळापर्यंत एसटीनेच प्रवास होणार : प्रत्येक पालखीत ६० वारकऱ्यांना दोन बसमधून प्रवासाला परवानगी
पुणे : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा जपण्यासाठी यंदा मनाच्या दहा पालख्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. प्रत्येक पालखीला दोन बसमधून ६० वारकऱ्यांसह प्रवास करता येणार आहे. मात्र, ६० वारकऱ्यांची नवे ही त्या-त्या संस्थानने निश्चित करण्याचा निर्णय घ्यायची आहे. त्यामुळे यंदाही वारीचा सोहळा वाखरी तळापर्यंत एसटी बसनेच होणार आहे. देहू येथून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे.
जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही एसटी बसनेच होणार आहे. मात्र मागील वर्षी केवळ २० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. यंदा मात्र, त्यात वाढ करून दोन बसमधून ६० वारकऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, प्रत्येक वारकऱ्याची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत चांगा वटेश्वर, संत निळोबाराय, संत नामदेवराय आधी राज्यातील दहा पालखी सोहळ्याला प्रत्येकी दोन बसमधून ६० वारकऱ्यांना वाखरी तळापर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वारीबाबत वारकऱ्यांच्या आणखी काही अपेक्षा आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा चर्चा करणार आहोत. राज्य शासनाने मागील वर्षीपेक्षा यंदा वारीसाठी जास्त सवलती दिल्या आहेत. वाखरीपासून पंढरपूरपर्यंत पायी चालण्यास परवानगी दिली आहे. करोनाची परिस्थिती पाहता राज्य शासनाने पालखी सोहळ्याबाबत घेतलेल्या निर्णयास तत्वत: मान्यता दिली आहे.- अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान