सातारा - आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सपत्नीक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. २० जुलै आषाढी एकादशी दिवशी पहाटे सव्वा दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. कोरोनामुळं यंदाही १० प्रमुख पालख्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात आला आहे. यंदाही विठ्ठलाच्या दर्शनापासून सर्वसामान्य वारकऱ्यांना वंचित राहावं लागत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर बिगबॉस फेम अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale) यांनी भाष्य केले आहे. बिचुकले हेदेखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अभिजित बिचुकले म्हणाले की, मी मागे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे आज मी पंढरपूरला निघालो आहे. संपूर्ण नाकेबंदी केली असली तरी भगवंताच्या मनात असले तर मी पोहचणार आहे. दारूची दुकाने उघडी असून राजकीय मेळाव्यांना हजारो लोक गर्दी करतात मग सज्जन वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यापासून माऊलीचं दर्शन घ्यायला का रोखलंय? इंग्रजांपेक्षा ठाकरे सरकार वाईट वागत आहे अशी टीका त्यांनी केली.
तसेच सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचा आवाज म्हणून मी तिथे जाणार आहे. पंढरपूरात पहिली पायरी चोखोबाची असते, चोखोबा उद्या नसतील म्हणजे उद्या अभिजित बिचुकले नसतील तर मग मुख्यमंत्र्याची पूजा यशस्वी होणार नाही असा टोलाही अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे विमान प्रवास शक्य नसल्यानं मुख्यमंत्री रस्ते मार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत.
गेल्या वर्षीदेखील मुख्यमंत्री ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी मर्सिडिजनं पंढरपूर गाठलं होतं. आता मात्र मुख्यमंत्री रेंज रोव्हरनं पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेल्या मर्सिडीजऐवजी आदित्य ठाकरेंच्या रेंज रोव्हरनं पंढरपूरकडे रवाना झाले. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९ च्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील. मुख्यमंत्री विमानानं मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले. मुंबई ते पंढरपूर या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री लोणावळ्याजवळ काही वेळ चहापानासाठी, विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पाऊस सुरु आहे. एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यांचे पार्किंग लाईट्स ऑन करुन ड्रायव्हिंग केलं जात आहे.