लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : अवघा रंग एकची झाला...रंगी रंगला श्रीरंग... अवघा रंग एकची झाला आषाढी वारी म्हटलं, की लहानथोर सारेच आपल्या परीने विठ्ठलभक्ती आणि वारकरी संप्रदायावर असणारी आपली निष्ठा अधोरेखित करीत असतात. बारामती येथे पालखीमार्गावर कुंचल्यातून आषाढी वारी अवतरली आहे. येथील कलाशिक्षकांनी एकत्र येऊन आषाढी वारीचे सुंदर चित्र रेखाटले आहे. त्यामुळे पालखीमार्ग वारीमय झाला आहे.जून महिन्यात मृगनक्षत्र सरत आले, की सर्वांनाच आषाढी वारीचे वेध लागलात. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाचा जयघोष आसमंतात भरून राहतो. विठ्ठलभक्तीच्या ओढीने चालणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला ‘सावळ्या’च्या भेटीची ओढ लागलेली असते. ‘भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद’ अशीच काहीशी अवस्था विठ्ठलदर्शनाने प्रत्येक वारकऱ्याची होत असते. मात्र, प्रत्येकालाच वारीचा हा पवित्र अनुभव घेता येत नाही. असे भाविक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वारकरी भाविकांची सेवा करून आपापल्या विठ्ठलभक्तीची प्रचिती देतात. मग यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. बारामती येथील विजय पवार, भारत काळे, रमेश मल्लाव, दीपक जगताप, महेंद्र दीक्षित आदी कलाशिक्षकांनी एकत्र येऊन पाटस रस्त्यावरील छत्रपती शाहू हायस्कूलच्या संरक्षक भिंतीवर आषाढी वारीचे सुंदर चित्र रेखाटले आहे. जणू काही कुंचल्यातून वारी अवतरल्याचा अनुभव पाहणाऱ्याला येत आहे.या चित्रात विठ्ठलाचे सावळे रूप, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्यासह टाळकरी, विणेकरी, पखवाजवादक, डोईवर तुळस घेतलेल्या वारकरी महिला, भालदार, चोपदार, निशानदार आणि पालखी खांद्यावर घेतलेले वारकरी पाहताना बारामतीकर हरखून जात आहेत. येत्या शनिवारी (दि. २४) बारामतीत संत तुकोबारायांची पालखी मुक्कमी असेल. या पार्श्वभूमीवर, हे चित्र कलाशिक्षकांनी रेखाटले असल्याने बारामतीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत पालखीमार्गावर या ‘कुंचल्यातील वारी’ने होणार आहे.
कुंचल्यातून अवतरली पंढरीच्या विठ्ठलाची वारी!
By admin | Published: June 22, 2017 7:17 AM