नितीन शिंदे,
भोसरी- राज्यात गोहत्या बंदी कायदा वर्षभरापूर्वी लागू झाला असला, तरी भोसरीतील पांजरपोळ गोशाळेने १६० वर्षांपासून गोपालनाची परंपरा जोपासली आाहे. आजपर्यंत लाखो अनाथ व भाकड जनावरांना संस्थेने जीवदान देण्याचे महत्कार्य केले आहे. पंपरी चिंचवडमधील भोसरी येथे १८५५ मध्ये पुणे पांजरपोळ ट्रस्ट गोपालन धाम ही संस्था सुरू झाली. गोशाळेत आजमितीला ७०० गायी, ३७० बैल, ७० म्हशी, ६० रेडे अशी १२०० जनावरे आहेत. पूर्वाश्रमीचे भोज राजाचे भोजापूर म्हणून परिचित असलेल्या भोसरीतील पांजरपोळ येथील गायरान जमिनीवर गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या काही गुराखी मित्रांनी गोसंवर्धनाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. २१ भाकड गायी काही जमा करून त्यांनी गोशाळा सुरू केली. संस्थेकडे एकूण १२ एकर जागा असून, त्यातील ६ एकर जागेवर १० गोठे, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, सभागृह, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था आहे. संस्थेत या जनावराच्या संगोपनासाठी ५० कर्मचारी अहोरात्र कार्यरत असून, ते आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. जनावरांचा सांभाळ करणारी संस्था म्हणून पांजरपोळ ट्रस्ट या संस्थने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी गोसंरक्षणाचा लढा सुरू केल्यानंतर, गोसंवर्धनाच्या उद्देशाने काम करणाऱ्या अनेक व्यक्ती पुढे आल्या. बाळासाहेब खेर व पारसी यांनी या संस्थेत विश्वस्त म्हणून उत्तम कामगिरी केली. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, साधू वासवानी, मोरारजी देसाई यांनी संस्थेला भेटी देऊन कामाचे कौतुक केले आहे.संशोधन, जनजागृतीदेशी गाईच्या दुधापासून दही, तूप आदी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. अशा प्रकारे संस्थेत संशोधनाचे कार्यसुद्धा होते. संस्थेतर्फे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याच्या पौर्णिमेला संस्थेत पूजा व चर्चासत्रे आयोजित करून समाजात गोसंवर्धनाबद्दल जागृती निर्माण केली जाते.कायद्याचा आधार मिळालामहाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा लागू करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व धार्मिक संस्थांना ५० वर्षे लढा द्यावा लागला. या लढ्यात पुणे पांजरपोळ ट्रस्टने अग्रणी भूमिका बजावली आहे. संस्थेला खूप अडचणी आल्या, पण त्यावर संस्थेने मात केली. गोसंवर्धनाचे काम अव्याहतपणे सुरू ठवेले. पुढील काळात पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने काम करण्याचा संस्थेचा मानस आहे.- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष -पुणे पांजरपोळ ट्रस्ट.अनाथ व भाकड जनावरांना जीवदान देऊन त्यांचे योग्य संगोपन करणे, हे संस्थेचे मुख्य काम आहे. गोहत्या थांबवण्यासंबंधी जनजागृती करण्याचे कामही संस्था करते. जो शेतकरी जनावरे पोसू शकत नाही, त्यांनी ती संस्थेकडे सोपवावी, पण शुल्लक पैशांसाठी कसायाच्या स्वाधीन करू नये.- कैलास घोरपडे ,व्यवस्थापक, पुणे पांजरपोळ ट्रस्ट,भोसरी.