धर्मादाय आयुक्तांचा निर्णय, भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक धक्का
मुंबई : छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्यकेशन ट्रस्टचे संस्थापक आणि विश्वस्त सुनील कर्वे यांना हटवून तिथे स्वत:चा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या केलेल्या नेमणुका धर्मादाय आयुक्त्यांनी बेकायदा ठरवल्या आहेत. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेले छगन भुजबळ व त्यांच्या कुटंबीयांना खूपच मोठा धक्का मानला जात आहे.
या निर्णयामुळे पंकज आणि समीर भुजबळ यांना एमईटीच्या कोणत्याही कामात लक्ष घालता येणार नाही वा संस्थेसंदर्भात कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. सुनील कर्वे यांनी १ फेब्रुवारी २0१२ मध्ये भुजबळ कुटुंबीयांनी एमईटीचा निधी व मालमत्ता यांच्यात १७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करणारा दावा धर्मादाय आयुक्तांकडे केला होता. त्यानंतर अवघ्या २५ दिवसांच्या काळात भुजबळ यांनी ट्रस्टचा चेंज रिपोर्ट आयुक्तांकडे सादर केला. त्याद्वारे सुनील कर्वे यांना हटवण्यात आले आणि एमईटीच्या सचिवपदी पंकज, तर खजिनदारपदी समीर भुजबळ यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे छगन भुजबळ यांनी धर्मादाय आयुक्तांना कळवले. कर्वे यांचा संस्थेशी संबंधच राहिला नसल्याचा दावाही भुजबळ यांनी तेव्हा केला.
मात्र या बदलांनाही कर्वे यांनी आव्हान दिले. त्यावर धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी प्रलंबित राहिल्याने कर्वे यांनी दोनदा उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी चार ते पाच महिन्यांत घेण्यात यावी आणि लगेच निर्णय द्यावा, असा आदेश २0१५ च्या अखेरीस धर्मादाय आयुक्तांना दिला. सहायक धर्मादाय आयुक्त गाडे यांच्यापुढे भुजबळ यांनी एमईटीमध्ये केलेल्या बदलांची (पंकज व समीर यांच्या नियुक्त्या) सुनावणी झाली. त्यानंतर १९ मे रोजी गाडे यांनी निकाल देताना पंकज यांची संस्थेच्या सचिवपदी व समीर यांची खजिनदारपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदा असल्याचा निर्णय दिला आहे.
सुनील कर्वे यांचा मूळ अर्ज त्यांना एमईटीच्या विश्वस्तपदावरून दूर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारा असून, त्यावरही धर्मादाय आयुक्तांकडे मंगळवारी सुनावणी सुरू होणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांतर्फे अॅड अमोल इनामदार यांनी तर सुनील कर्वे यांच्या वतीने अॅड देवव्रत सिंग यांनी काम पाहिले.