ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी १०.१५ च्या सुमारास पंकज भुजबळ इडीच्या कार्यालयात दाखल झाले.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मिळालेला पैसा मार्गी लावण्यासाठी छगन भुजबळ यांनी स्थापन केलेल्या विविध कंपन्यांमध्ये समीर भुजबळ यांच्याबरोबर पंकज भुजबळही सहसंचालक आहेत. इडीने मागच्या आठवडयात पंकज भुजबळ यांना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते.
इडीच्या बेलार्ड इस्टेट कार्यालयात पंकज भुजबळ सकाळी १०.१५ वाजता दाखल झाले. पंकज भुजबळ यांच्यासोबत सीए सुध्दा उपस्थित आहे का ? या प्रश्नावर त्यांचे वकिल साजल यादव म्हणाले कि, चौकशीच्यावेळी सीए उपस्थित नसेल मात्र आवश्यकता पडली तर, व्यवहाराची माहिती इडीला देण्यासाठी सीए येऊ शकतो.
ज्या दोन कंपन्यांची चौकशी सुरु आहे त्या पर्वेश कनस्ट्रक्शन आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समीर आणि पंकज भुजबळ संचालक आहेत. पंकज यांना सुध्दा समीर यांच्याप्रमाणे अटक होणार ? ते लवकरच स्पष्ट होईल.
तपासात सहकार्य करत नसल्याबद्दल समीर भुजबळ यांना अटक केल्याचे इडीने सांगितले. इडीकडून पंकज आणि समीर यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेला गेलेले छगन भुजबळ आज मुंबईत दाखल होत असून, दुपारी ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. छगन भुजबळ आज मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.