परळी (जि. बीड) : राजकीय महत्त्वकांक्षेमुळे दुरावलेल्या बहीण-भावातील राजकीय मतभेद कौटुंबिक दु:खापुढे गळून पडले. पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सांत्वन करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या तातडीने धावून आल्या. दु:खाच्या प्रसंगी बहिणीने भावाला आधार दिला; रक्ताच्या या नात्याचे भावबंध पाहून उपस्थितही शुक्रवारी गहिवरले. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे बंधू तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शुक्रवारी त्यांना परळीत लाखो जनसमुदायाने साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. अंबाजोगाई रोडवरील कन्हेरवाडी शिवारातील त्यांच्या शेतात दुपारी ३.३०च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. कुटुंबातील सदस्य म्हणून पालकमंत्री पंकजा मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञा, खा. डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनीही यावेळी उपस्थिती लावली. राजकीय मतभेदामुळे धनंजय व पंकजा हे मागील चार वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले आहेत. दोघांमधील राजकीय वैर इतके टोकाचे की एकमेकांच्या समोर आले तरी ते एकमेकांकडे पाहण्याचेही टाळत. पंकजा यांच्यावर चिक्की घोटाळ्यापासून अनेक राजकीय आरोप करत धनंजय यांनी त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी अनेकदा केली. पंकजा यांनीही अनेकदा धनंजय यांच्यावर निशाणा साधत त्यांची राजकीय कोंडी केली. अगदी चार दिवसांपूर्वीच भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बहिण-भाऊ आमने-सामने उभे राहिले.राजकारणात दोघेही टोकाची भूमिका घेत असले तरी रक्ताचे नाते वेगळे आणि राजकारण वेगळे हे दाखवून देत शुक्रवारी पंकजा यांनी बहिणीची भूमिका निभावली. पंकजा यांनी आपल्या आई-बहिणीसमवेत धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन पंडितअण्णा मुंडे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अंत्ययात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशा दु:खद प्रसंगी संपूर्ण मुंडे कुटुंब एकत्रित आले. (प्रतिनिधी)
पंकजा यांनी केले धनंजय मुंडे यांचे सांत्वन
By admin | Published: October 15, 2016 4:03 AM