- डिप्पी वांकाणी, मुंबईआपल्याकडे पैसा कोणत्या मार्गाने आला याविषयी आणि स्वत:च स्थापन केलेल्या अनेक कंपन्यांबद्दल सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे पंकज भुजबळ यांना देता आली नाहीत. बऱ्याच कामांची जबाबदारी समीर भुजबळच पार पाडायचा, असे पंकज भुजबळ यांनी ९ तास चाललेल्या चौकशीत मंगळवारी सांगितले, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.पंकज यांची पुढील आठवड्यात पुन्हा चौकशी केली जाणार आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारांची पंकजना माहिती नाही, असे आमचे प्राथमिक निरीक्षण आहे आणि ज्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे त्या कंपन्यांत पंकज संचालक असल्यामुळे त्यांची आरोपांतून सुटका होत नाही, असे या सूत्रांनी सांगितले. छगन भुजबळ यांचीही चौकशी होणार आहे; परंतु ती नंतरच्या टप्प्यात होणार असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली. ‘‘भुजबळांच्या कंपन्यांमध्ये धनादेशाद्वारे पैसे पाठविण्याची व्यवस्था केलेल्या कोलकाता येथील हवाला आॅपरेटरबद्दल काही माहिती आहे का, इंडोनेशियातील खाणींच्या व्यवहारांचा तपशील माहिती आहे का आणि तुमच्या कंपनीचे शेअर्स अव्वाच्या सव्वा भावाने (अनरिअॅलिस्टिक) विकत कोणी घेतले असे आम्ही विचारले असता, बहुतेक प्रश्नांना मला त्यांचा तपशील माहीत नाही, त्यातील बऱ्याच गोष्टींची जबाबदारी समीर भुजबळ पार पाडायचा, असे पंकज यांंनी सांगितले, असे ईडीचा वरिष्ठ अधिकारी म्हणाला. कोलकाता येथील अर्थ सल्लागार संजीव जैन याने चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक याच्याकडून रोख ८ कोटी रुपये घेतल्याचे आणि आर्मस्ट्राँग एनर्जी व परवेश कन्स्ट्रक्शन्सला धनादेशाद्वारे हे पैसे दिल्याची कबुली दिली आहे. चार्टर्ड अकाउंटंट चंद्रशेखर सारडा यांनी मिनुटेक्स प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मंगल सॅगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या स्थापन केल्याचे व त्यांच्या खात्यात अनुक्रमे १०.२४ कोटी आणि १५.७८ कोटी रुपये पाठविण्याची व्यवस्था केल्याचे तसेच नंतर हे पैसे परवेश कन्स्ट्रक्शन्समध्ये ठेवल्याचे मान्य केले आहे. या गुंतागुंतीच्या व्यवहारांची पंकज भुजबळना माहिती असल्याचे दिसत नाही. तरीही बहुतेक कंपन्यांमध्ये समीरसोबत पंकजही संचालक असल्यामुळे केवळ अज्ञान त्यांना आरोपमुक्त करू शकत नाही. पुढील आठवड्यात आम्ही पंकजची पुन्हा चौकशी करणार आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. छगन भुजबळ यांची तुम्ही चौकशी करणार का? असे विचारता त्यांचीही चौकशी निश्चित होणार आहे; परंतु ती नंतरच्या टप्प्यावर, असे तो म्हणाला.छगन भुजबळ यांनी मंगळवारी सांगितले होते की, आमच्या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी भाग विकत घेतले आणि त्यांना व्यवसायातील नफाही मिळेल, असे मानण्यात आले होते. भुजबळ यांच्या म्हणण्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सांताक्रुझमधील परवेश कन्स्ट्रक्शन्सच्या मालकीच्या सॉलिटेअरमध्ये ते कसे मुक्काम करू शकतात, कारण भुजबळांच्या मालकीचे खूपच कमी भाग असून, त्यातील बहुतेक भाग विकलेही गेलेले आहेत, असे नमूद केले. म्हणजे ते भाग विकत ज्यांनी घेतले होते ते अप्रत्यक्षरीत्या कंपन्यांचे नियंत्रण करीत होते.
पंकजकडे उत्तरे नव्हती
By admin | Published: February 11, 2016 1:53 AM