नवी मुंबई : तळोजा येथील बहुचर्चित हेक्स सिटी गृहप्रकल्पातील घरांसाठी गुंतवणूक केलेल्या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर व मुलगा पंकज यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत हा तिसरा गुन्हा नोंदविला गेल्याने भुजबळ कुटुंबाची अधिकच कोंडी झाली आहे.देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून तळोजा येथे हेक्स वर्ल्ड या गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र सन २००९ पासून हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. घरासाठी पैसे गुंतवलेल्या ग्राहकांनी या प्रकरणी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून कंपनीच्या पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पंकज भुजबळ, समीर भुजबळ, राजेश दारभ, अमित बलराज, सत्यम केसरकर यांचा समावेश आहे.तळोजा येथे २५ एकर जागेत हा भव्य गृह प्रकल्प उभारला जाणार आहे. तक्रारदारांनी घराचा ताबा मिळावा यासाठी यापूर्वी आंदोलनेदेखील केलेली आहेत. परंतु संबंधितांकडून त्यांना दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी यासंबंधीची तक्रार तळोजा पोलिसांकडे केली. हेक्स गृह प्रकल्पात सुमारे दोन हजार ग्राहकांनी घरासाठी गुंतवणूक केल्याची शक्यता आहे. त्यानुसार या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करीत आहेत.महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह १७ जणांवर नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्येही पंकज व समीर भुजबळ यांच्या नावांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांतील भुजबळ कुटुंबावरील हा तिसरा गुन्हा असल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची कोंडी अधिकच वाढली आहे. (प्रतिनिधी)माजी मंत्री छगन भुजबळांवर राजकीय सुडातून एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे केला. ते म्हणाले की ज्या आरोपावरून हे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांतील काही निर्णय मंत्रिमंडळाने तर काही निर्णय उपसमित्यांनी घेतले आहेत. त्यात भुजबळांना दोषी धरता येणार नाही. अशा प्रकारे एकमेकांचे उट्टे काढण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्रात यापुढे सुडाचे राजकारण सुरू होण्याची भीती आहे, असा इशारा देत विखे-पाटील म्हणाले की, राजकीय हेतू ठेवून केलेली कारवाई आपण सहन करणार नाही.
पंकज, समीर भुजबळांवर फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: June 14, 2015 1:55 AM