मुंबई - अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. गुरुवारी, परळीजवळील गोपीनाथ गडावर, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पंकजा मुंडे आणि एकनाथ ऊर्फ नाथाभाऊ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे अजिबात जाणवले नाही अशा शब्दात संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत दैनिकाने खडेबोल सुनावले आहेत.
रोहिणी आणि पंकजा मुंडे पराभूत झाल्यात. या पराभवाचे शल्य मनात ठेवूनच हे दोघेही बोलले. आपल्या पराभवाचे खापर या दोघांनीही, पक्षनेतृत्वावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर आणि अप्रत्यक्षपणे मोदी-शाह या दिग्गज नेत्यांवर फोडले. नाथाभाऊ म्हणाले की, मी पक्षासाठी झिजलो, झटलो. पक्षाला खूप काही दिले. पंकजा म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी पक्षाला खूप काही दिले. या दोघांच्या दाव्यात कणभरही अतिशयोक्ती नाही. परंतु, हे दोघेही हे विसरले की, पक्षानेही तुम्हाला काय दिले, हे जनताही लाखो डोळ्यांनी बघत असते असा टोलाही एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
तरुण भारत अग्रलेखाती महत्त्वाचे मुद्दे
- आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते.
- जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते.
- आपण ज्यांना नेता मानतो ती माणसे, एका साध्या पराभवाने किती सैरभैर होतात, याचे दिग्दर्शन मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या मेळाव्यात झाले. विरोधकांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील आणि त्या अस्वाभाविकही नाही. परंतु, भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत, त्यांचे मन मात्र चरकल्याशिवाय राहिले नसेल.
- पक्षाचे चुकत नाही, माणसे चुकतात. चंद्रकांतदादा पाटलांचे हे शब्द सर्वांनीच ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. एखादा परिपक्व नेता कसा असतो, कसा विचार करतो आणि कसा बोलतो, याचे एक उदाहरण दादांनी या भाषणातून सर्वांसमोर ठेवले आहे.
- मुळातच गोपीनाथ मुंडे काय किंवा चंद्रकांतदादा पाटील काय, ही मंडळी चळवळीतून समोर आली आहेत आणि जी मंडळी अशी चळवळीतून, संघर्षातून पुढे आलेली असतात, त्यांना पक्षही बरेच काही देण्यास उत्सुक असतो.
- पंकजा मुंडेंच्या बाबतीत मात्र, त्या चळवळीतून किंवा संघर्षातून पुढे आल्यात, असा काही इतिहास नाही. वडिलांची पुण्याईच इतकी प्रचंड होती की, त्याचा त्यांना अनायास लाभ मिळाला. परंतु, पुण्य नेहमीच झपाट्याने कमी होत असते.
- महाराष्ट्रातील भाजपाच्या बाबतीत पक्षनिष्ठेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास तीन ‘राम’ आठवतात. आजही त्यांचीच उदाहरणे दिली जातात. राम म्हाळगी, राम कापसे आणि राम नाईक. या तीन ‘रामां’च्या मध्ये एका ‘नाथा’लाही स्थान देण्यास भाग पाडणारी संधी खडसेसाहेबांनी गमाविली,
- अन्याय कुणावर होत नाही? पक्ष चालविताना वरिष्ठांना बरेचदा असे निर्णय घ्यावे लागतात की, त्याने कुणावर तरी अन्याय होणार असतो. नाथाभाऊ तर पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात वावरले आहेत. आपल्यामुळे कुणावरही अन्याय झाला नाही, कुणीही दुखावले गेले नाही, पक्षातील कुणाचीही गळचेपी झाली नाही, असे नाथाभाऊ तरी छातीठोकपणे सांगू शकतील का?
- या दोघांनीही बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात. समजा, एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?
- या दोघांनाही विस्थापित करणारे जे नेतृत्व उभे झाले आहे तेही बहुजन समाजाचेच आहे, हे यांच्या लक्षातच येत नाही. काळ वेगाने बदलत आहे. मतदारांची मानसिकता, आशा-अपेक्षा खूप बदलत चालल्या आहेत. याची जाण या दोघांनाही नाही, असेच दिसून येते.
- काळाची ही बदलती पावले यांनी ओळखली नाही, म्हणून त्यांची ही अशी अवस्था झाली आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल. गेल्या पाच वर्षांतील आपले वागणे, बोलणे, चालणे, कार्यकर्त्यांशी संवाद इत्यादी आघाडीवर आपला परफॉर्मन्स कसा होता, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
- निवडणूक ही परीक्षा मानली तर हे दोघेही यात अनुत्तीर्ण झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षेची संधी असते. परंतु, हे दोघेही ती संधी वाया घालविण्याचीच शक्यता अधिक वाटत आहे. गोपीनाथ गडावर झालेली भाषणे तरी हाच संकेत करणारी होती.
- भाजपा हा सर्वार्थाने ‘वेगळा’ पक्ष आहे. आणि आपले हे ‘वेगळेपण’ या पक्षाने वारंवार सिद्धही केले आहे. या पक्षाची काम करण्याची, प्रतिक्रिया देण्याची एक शैली आहे. तिचा अभ्यास केला पाहिजे.
- भाजपातील ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यांनी किती बंडखोरी केली? ते बोलत राहिले. पक्षावर आरोप करीत राहिले. पक्ष मात्र मौनच राहिला... परवा पंतप्रधान मोदींनी पुण्यांत अत्यंत आस्थेने रुग्णशय्येवर असलेल्या अरुण शौरी यांची आवर्जुन भेट घेतली. ही या पक्षाची संस्कृती आहे.
- राजकीय पक्ष असो, की राजकारणाचा आखाडा, तिथे शक्तीलाच मान असतो. आपली शक्ती कमी झाली की, उपेक्षेचे ढग दाटून येऊ लागतात. हा संकेत असतो, सावध होण्याचा. स्वत:ला सावरण्याचा. आत्मपरीक्षण करण्याचा. योग्य वेळेची वाट बघणार्या धैर्याचा. हा संकेत जे समजतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, त्यांच्या आयुष्यात संध्याकाळ आली, तरी तिच्यात उष:कालाची अंकुरलेली बीजेही असतात